अकोला : मूर्तिजापूर येथील सहायक गटविकास अधिकारी के.बी. श्रीवास्तव यांना न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा सेवेत रुजू करून घेण्याचा आदेश सोमवारी ग्रामविकास विभागाने दिला. जात प्रमाणपत्र सादर न करू शकल्यामुळे त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिले होते. बुलडाणा जिल्हा परिषदेत विस्तार अधिकारी या पदावर नियुक्त झाल्यानंतर तत्कालीन गटविकास अधिकारी वर्ग २ या पदावर पदोन्नती मिळविल्यामुळे श्रीवास्तव यांना जात प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. खोटी जात दाखवून त्यांनी पदोन्नती घेतल्याची तक्रार उद्धव अर्जुन डोळे यांनी लोकायुक्तांकडे केली होती. लोकायुक्तांपुढे झालेल्या सुनावणीत श्रीवास्तव जात प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्याचा आदेश लोकायुक्तांनी दिला होता. या आदेशानुसार श्रीवास्तव यांना ग्रामविकास विभागाने १७ जुलै रोजी बडतर्फ केले होते. दरम्यान, श्रीवास्तव यांनी लोकायुक्तांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले. या याचिकेवर ११ जुलै आणि ८ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने पारित केलेल्या आदेशानुसार ग्रामविकास विभागाने श्रीवास्तव यांच्या बडतर्फीचा आदेश रद्द केला आहे. त्यांना न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून सेवेत रुजू करून घेण्याचे आदेश सोवमारी ग्रामविकास विभागाने दिलेत.
मूर्तिजापूर बीडीओंना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्याचा आदेश
By admin | Updated: August 12, 2014 01:01 IST