अकोला: धनादेश अनादरप्रकरणी कलम १३८ नुसार न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणामध्ये सुनावणीदरम्यान दिलेल्या तारखांवर आरोपी अनुपस्थित राहत असल्याने, न्यायालयाने त्याला नोटिस बजावूनही तो न्यायालयात हजर होत नव्हता. त्यामुळे न्यायालयाने आरोपीला फरार घोषित करून त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले. जठारपेठतील केला प्लॉटमध्ये राहणारे हरविंदरसिंह प्रीतपाल यांनी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात कलम १३८ अंतर्गत याचिका दाखल केली. त्यात त्यांचा ट्रक ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांनी आपले तीन ट्रक भाडेतत्त्वावर नवजीवन टेरेस येथे राहणारा दिलीपकुमार जयराम सिंग याला २५ जानेवारी ते २३ फेब्रुवारी २0१३ दरम्यान दिले होते.या ट्रकचे भाडे ४ लाख २0 हजार देण्याचे ठरले होते. दरम्यान, काही कारणास्तव हरविंदरसिंह यांनी ट्रक परत बोलाविले आणि दिलीपकुमार सिंग यांना ट्रकचे भाडे देण्याची मागणी केली. आरोपी दिलीपकुमारने हरविंदरसिंह यांना १ लाख २0 हजार रुपये दिले आणि उर्वरित रकमचे त्यांना दोन धनादेश दिले. हरविंदसिंह यांनी धनादेश वटविण्यासाठी बँकेकडे दिले असता, बँकेने त्यांना तुमचे धनादेश थांबविण्यात आल्याची माहिती दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर हरविंदसिंह यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. यावर न्यायालयाने सुनावणी सुरू केली; परंतु सुनावणीदरम्यान आरोपी दिलीपकुमार सिंग हा सातत्याने अनुपस्थित राहत होता. न्यायालयाने अनेक वेळा नोटिस बजावूनसुद्धा तो न्यायालयात हजर झाला नाही. न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केल्यामुळे न्यायालयाने त्याला फरार घोषित करून त्याची कलम ८३ (४) नुसार संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले.
फरार आरोपीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश!
By admin | Updated: May 13, 2017 05:14 IST