अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या दृष्टिकोनातून भाजप-शिवसेना महायुतीतील नेत्यांची सोमवारी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. शिवसंग्रामसह महायुतीतील सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघाचा मुद्दा गाजला. विनायकराव मेटे यांच्यासह संदीप पाटील यांनी हा मतदारसंघ शिवसंग्रामसाठी सोडण्यावर भर दिला. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी १५ ऑगस्टपूर्वी निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. चर्चेची दुसरी फेरी मुंबईत सोमवारी पार पडली. यावेळी महायुतीत समाविष्ट असलेल्या घटकपक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांसाठी मतदारसंघाबाबत दावे केलेत. यात शिवसंग्रामचे नेते विनायकराव मेटे यांनी ३५ जागांची मागणी केली असून, त्यात अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघाचाही समावेश आहे. हा मतदारसंघ शिवसंग्रामचे संदीप पाटील यांच्यासाठी सोडण्यावर भर देण्यात आला. या बैठकीला भाजप व शिवसेनेच्या नेत्यांसोबतच शिवसंग्रामचे विनायकराव मेटे, संदीप पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेवराव जानकर व राजेंद्र मस्के आदींची उपस्थिती होती.
महायुतीच्या जागावाटप बैठकीत बाळापूरचा मुद्दा गाजला
By admin | Updated: July 30, 2014 01:19 IST