अकोला : कर्करोगांवरील उपचारासाठी मानवी शरीरातील 'स्टेम सेल्स' अर्थात मूळ पेशी या अत्यंत प्रभावी ठरतात. या पेशी कुटुंबातील सदस्यांमध्ये आढळण्याचे प्रमाण केवळ २५ टक्के असल्याने, रुग्णाच्या कुटुंबीयांना ऐच्छिक दात्यांचा शोध घ्यावा लागतो. अशावेळी त्यांच्यासमोर उभा राहणारा खर्चाचा डोंगर कमी करण्याच्या उद्देशातून रुग्ण आणि स्टेम सेल्स दात्यांची अधिकृत माहिती एकत्रित करण्याच्या प्रस्तावावर आरोग्य मंत्रालय विचाराधीन आहे.कर्करोग म्हटला की, डोळय़समोर 'दर्द का रिश्ता' या हिंदी चित्रपटातील लाडक्या लेकीचा जीव वाचविण्यासाठी जीवाचं रान करणारा तिचा पिता सुनील दत्त उभा राहतो. ब्लड कँसर झालेल्या मुलीला वाचविण्यासाठी मानवी शरीरातील आवश्यक असणारा घटक मिळविण्यासाठी त्याची होणारी फरफट डोळय़ासमोर उभी राहते. प्रभावी पण खर्चिक असलेल्या या उपचार पद्धतीने जवळच्या व्यक्तीवर उपचार करताना अजूनही रुग्णाच्या नातलगांना मूळ पेशी दात्यांचा शोध घ्यावा लागतो. स्टेम सेल्स या केवळ मानवी शरीरात अस्थिमेदामध्येच आढळतात. या पेशींच्या सहाय्याने रुग्णाच्या शरीरात लाल पेशी, श्वेत रक्तपेशी आणि प्लेटलेट्सची निर्मिती करता येते. दाते आणि ग्राहक यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव तसेच दात्यांचा अभाव यामुळे कर्करोग झालेल्या रुग्णांवर वेळेवर उपचार होऊ शकत नाहीत. काही खासगी रुग्णालयांमध्ये स्टेम सेल्स थेरपीसाठी लाखो रुपयांची आकारणीदेखील केली जाते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी 'नॅशनल हेल्थ मिशन'च्या माध्यमातून आणि 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' (एम्स)च्या मदतीने रुग्ण आणि 'स्टेम सेल्स'दात्यांची अधिकृत माहिती एकत्रित करण्याचे आरोग्य मंत्रालयाच्या विचाराधीन आहे. स्टेम सेल्स दात्यांची यादी तयार झाल्यानंतर आवश्यकतेच्यावेळी इच्छुक दात्यांशी संपर्क साधणे शक्य होणार आहे.
आरोग्य मंत्रालय दूर करणार ‘दर्द का रिश्ता’!
By admin | Updated: January 3, 2015 00:42 IST