जळगाव जामोद : तालुक्यातील पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्याचा संपर्क तुटला असून पुलावरुन आज २४ जुलै रोजी संध्याकाळी ८ फूट पाणी वाहत होते. त्यामुळे आजही संपूर्ण दिवसभर जळगाव, नांदुरा मार्गावरील वाहतूक ठप्प होती. त्यामुळे जळगाव जामोद आगाराने सर्व बसफेर्या मुक्ताईनगर मार्गे वळविल्या आहेत. २२ जुलैच्या रात्री तालुक्यात सर्वाधिक पाऊस कोसळला. त्यामुळे २३ जुलै रोजी पूर्णानदी दुथळी भरुन वाहू लागली. त्यामुळे मानेगाव जवळचा पूल पाण्याखाली येवून वाहतूक थांबली होती. तो पूर आज उतरण्याची शक्यता होती मात्र अकोला, अमरावती जिल्ह्यातून येणारे पाणी त्यातच धरणातील पाण्याचा विसर्ग होत असल्याने आज पूर्णा खाली झाली नाही. तसेच वाण धरणाचे सुध्दा चार दरवाजे उघडल्याने पूर्णेचा पूर स्थिर आहे. हा मार्ग नांदुरा, खामगाव, अकोला, बुलडाणा येथे जाण्यास सोयीचा आहे. मात्र पुरांमुळे प्रवाशांना १00 किमी अंतराचा फेरा घेवून मुक्ताईनगर मार्गे जावे लागत असल्याने प्रचंड आर्थिक फटका बसत आहे. तसेच वेळ सुध्दा खर्ची जात आहे. उलट जळगाव आगाराला मात्र या पूरपरिस्थितीचे काळात आर्थिक फायदा होतो आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी महत्वाच्या कामासाठी जाणे, शिक्षणासाठी बाहेरगावी जाणार्या विद्यार्थ्यांना मात्र त्रास होत आहे. तर व्यापार्यांनाही आर्थिक भूर्दंड बसत आहे. अनेकांना अत्यावश्यक कामासाठी जाणे असल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. येरळी येथे या पूर्णानदीवर नवीन पुलाचे बांधकाम चालू आहे. मात्र सदर बांधकाम निधीअभावी संथगतीने सुरु असल्याची माहिती असून शासनाने त्यावर तात्काळ निधीची तजवीज करुन पुलाचे काम पूर्ण करावे व या तालुक्यातील जनतेची दरवर्षी पावसाळ्यात पुरामुळे होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
पूर्णेचा पूर दुसर्या दिवशीही कायम
By admin | Updated: July 25, 2014 00:19 IST