अकोला: भारनियमनामुळे शेतीपंपांना विद्युत पुरवठा मिळत नसून, शेतकर्यांना नुकसानाचा सामना करावा लागतो, अशी ओरड नेहमीच होत असते. आता मात्र यावर महावितरणने तोडगा शोधला आहे. पाण्याचा उपसा करण्यावर कठोर निर्बंध करून शेतीपंपांना २४ तास वीजपुरवठा करणे शक्य असल्याचे सूतोवाच महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. विजेपेक्षा पाणीप्रश्न अधिक गंभीर आहे. केवळ महिनाभर उशिरा आलेल्या पावसाचे परिणाम दिसून येत आहे. विदर्भातील धरणांमध्ये अजूनही मुबलक पाणी आहे. यावर्षी पाऊस नसल्यामुळे अनेक शेतकरी ओलित करून शेती करण्यावर भर देत आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकरी बांधवांकडून आठ ते दहा तासांऐवजी आता २४ तास विजेची मागणी होत आहे. भारनियमनामुळे त्यांना नुकसानाचा सामना करावा लागत आहे. महावितरणकडून शेतीपंपासाठी २४ तास वीज उपलब्ध करून देता येणे शक्य आहे; परंतु त्यासाठी काही पथ्य पाळावे लागतील. पाण्याच्या उपशावर निर्बंध ठेवण्यासाठी ज्याचा वीजवापर अधिक त्यास वीजदर अधिक या सूत्राचा अवलंब करून तसा प्रस्ताव विद्युत नियामक आयोगाकडे द्यावा लागेल, असे सूतोवाच महावितरणच्या व्यवस्थापकीस संचालकांनी दिला आहे. गेल्या पाच वर्षांत महावितरणने देशात १0 लाख शेतीपंपांना नवीन वीज जोड दिले आहे.
शेतीपंपांना मिळणार २४ तास वीज
By admin | Updated: July 23, 2014 00:57 IST