संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पावसाने गत पंधरा दिवसांपासून दांडी मारल्याने, जिल्ह्यात १२ जुलैपर्यंत केवळ ५३ टक्के खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उगवलेली पिकेही सार्वत्रिक दमदार पावसाअभावी धोक्यात आली आहेत. त्यामुळे वर्षभरानंतर यंदाही जिल्ह्यात दुष्काळाचे सावट पसरले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला; मात्र अद्यापही जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नाही. जूनमध्ये अधून-मधून रिमझिम बरसलेल्या पावसानंतर जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या सुरू केल्या; परंतु गत २ जुलैनंतर पावसाने दांडी मारल्याने, जिल्ह्यात सुरू झालेल्या खरीप पेरण्या थांबल्या. जिल्ह्यात ४ लाख ८१ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले असले, तरी १२ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ २ लाख ५७ हजार ४९४ हेक्टर (५३ टक्के) क्षेत्रावर खरीप पेरणी करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी इत्यादी खरीप पिकांचा समावेश आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील उर्वरित २ लाख २४ हजार ६ हेक्टर (४७ टक्के) क्षेत्रावरील खरीप पेरणी अद्यापही रखडली आहे. रिमझिम पाऊस झाल्यानंतर जिल्ह्यात करण्यात आलेल्या पीक पेरणीनंतर पिके उगवली; मात्र गत पंधरा दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने, उगवलेल्या पिकांनीही माना टाकल्या आहेत. सार्वत्रिक दमदार पावसाअभावी पिके धोक्यात आल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. गत २०१४ व २०१५ च्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर मागील एक वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला, तरी जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पाऊस अद्यापही बरसला नसल्याने, यंदाही जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचे सावट पसरल्याचे चित्र आहे. या पृष्ठभूमीवर दडी मारून बसलेला पाऊस जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार हजेरी केव्हा लावणार, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.२५ हजार हेक्टरवर दुबार पेरणी; अहवाल शासनाकडे!जिल्ह्यात २५ हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी करण्यात आल्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गत आठवड्यात शासनाच्या कृषी विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही भागात दुबार तर काही भागात तिबार पेरणीचा खर्च सहन करावा लागत आहे.पावसातील खंडामुळे जिल्ह्यात २५ हजार हेक्टरवर दुबार पेरणी करण्यात आल्याचा अहवाल गत आठवड्यात शासनाकडे सादर करण्यात आला. गत तीन-चार दिवसात होत असलेल्या रिमझिम पावसामुळे धोक्यात आलेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे. दमदार पावसाअभावी जिल्ह्यात ४७ टक्के पेरण्या रखडल्या आहेत. आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास शेतकऱ्यांना तूर, तीळ व सूर्यफूल अशा पर्यायी पिकांची पेरणी करावी लागेल.- रवींद्र निकम, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी
यंदाही दुष्काळाचे सावट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:41 IST