बुलडाणा : उन्हाळयाच्या दिवासांमध्ये करती मंडळी कामावर गेले की घरातील सर्व महिला शेजारपाजारच्या मैत्रिणी एकत्र येऊन अंगणात शेवया, कुरड्या, आलुचिप्स, सांडगे, धापोडे, मूगवड्या आदी वाळवणीचे पदार्थ तयार करायची. वर्षभरासाठी घरात नवीन आणलेल्या धान्यालादेखील ऊन दाखविलं जायचं. मात्र, वाढती अपार्टमेंट संस्कृती व वाळवणीचे पदार्थ बाराही महिने दुकानांमध्ये उपलब्ध असल्यामुळे वाळवण घालण्याची प्रथा आता लुप्त होत चालली आहे. वाढत्या लोकसंख्येत सिमेंटचे जंगल उभे झाले आणि घरांचे सौंदर्य असणारे अंगण हरविले. त्याची जागा आता कुठेतरी मैदानांनी घेतली आहे. फ्लॅटमधून खाली येण्यास कुणाला सवड नसल्याने पूर्वीप्रमाणे वाळवणीचे पदार्थ तयार करताना कुणी दिसत नाही. लुप्त होत चाललेली एकत्र कुटुंब पद्धती व अंगवळणी पडत असलेली आधुनिक जीवन शैली, यामुळे शेजारीपाजारी तर दूरच घरातील महिला एकत्र येणे दुरापास्त होत चालले आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अर्थार्जन करतानादेखील अनेकींचा जीव मेटाकुटीस येतो. घर, नोकरी, मुलं-बाळं सांभाळून वाळवणीचे पदार्थ तयार करणे अत्यंत जिकरीचे वाटत असल्याने ते तयार करण्याऐवजी विकत आणण्याकडे शहरातील महिलांचा अधिक ओढा दिसून येतो. ग्रामीण भागात अद्याप तरी हे लोण पसरलेले दिसत नाही. वेळात वेळ काढून शेत मजुरीची कामे करणार्या महिला शेवया, कुरड्या, पापड इ. तयार करताना दिसून येतात. या कामाला व्यवसायाची जोड देत ग्रामीण भागातील अनेक महिला बचत गटाच्या माध्यमातून अर्थार्जन करीत आहेत.
वाळवण झाले कालबाह्य!
By admin | Updated: May 10, 2014 23:26 IST