अकोला: जुने शहर पोलिस ठाण्याचे विभाजन करून नवीन पोलिस ठाणे निर्मिती करण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्येच नव्या राजेश्वर पोलिस ठाण्याची (पूर्वीचे जुने शहर पोलिस ठाणे) निर्मिती होण्याची शक्यता आहे; परंतु अद्याप नव्या पोलिस ठाण्याच्या उद्घाटनाची तारिख अद्याप ठरली नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. जुने शहर पोलिस ठाण्यांतर्गत येणारा शहरी परिसर आणि ग्रामीण परिसराचे क्षेत्रफळ मोठे असल्याने पोलिस कर्मचार्यांना गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. सोबतच जुने शहरातील काही भाग अतिसंवेदनशील आहे. कामकाजाच्या दृष्टिकोनातूनही जुने शहर पोलिस ठाण्याचे विभाजन करण्याची मागणी होत होती. राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील, राज्याचे पोलिस महासंचालक, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बिपीन बिहारी, पोलिस अधीक्षकांकडे पत्रव्यवहारही करण्यात आला. यासंदर्भात यानुसार सप्टेंबर २0११ रोजी पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी, शहरातील जुने शहर व सिव्हिल लाईन पोलिस ठाण्याचे विभाजन करून नवे पोलिस ठाणे निर्मितीचा प्रस्ताव अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या माध्यमातून राज्याच्या पोलिस महासंचालकाकडे पाठविण्यात आला होता. अखेर तब्बल तीन वर्षांनंतर हा प्रस्ताव मार्गी लागला आहे. सिव्हिल लाईन पोलिस ठाणे वगळता जुने शहर पोलिस ठाणे निर्मितीचा प्रस्ताव मंजूर झाला आणि पोलिस ठाणे निर्मितीच्या दृष्टिकोनातून पोलिसांचे संख्याबळ व निधी आणि जागासुद्धा मंजूर केली. आता लवकरच जुने शहर पोलिस ठाण्याचे विभाजन करून नवे राजेश्वर पोलिस ठाणे उभे राहणार आहे.
जुने शहर पोलिस ठाण्याचे अखेर विभाजन
By admin | Updated: July 23, 2014 01:00 IST