राम देशपांडे/ अकोला : मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, पुणे आणि सोलापूर या पाचही विभागात रेल्वे मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करीत असताना गत तीन वर्षांत घडलेल्या ६५५ अपघातात ३३ रेल्वे कर्मचार्यांना आपला जीव गमवावा लागला. ही गंभीर बाब लक्षात घेऊन, लांबून येणार्या गाडीच्या स्पंदनांचा आधार घेत धोक्याची पूर्वसूचना देणारी यंत्रणा (इलेक्ट्रॉनिक अर्ली वॉर्निंग सिस्टिम - ईईडब्ल्यूएस) मुंबई विभागाने विकसित केली आहे. मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यात ही यंत्रणा पाचही विभागात कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकार्यांनी दिली. रेल्वे मार्गांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने विशेष दक्षता घेतली जाते. रेल्वेने नियुक्त केलेल्या पर्यवेक्षक, गँगमन व इतर कामगारांच्या चमूद्वारा आवश्यक त्या ठिकाणी वेळ ठरवून रेल्वे रुळाच्या देखभाल व दुरुस्तीचे काम केले जाते. बहुतांश वेळा रेल्वेने प्रवास करीत असताना आपण रेल्वे मार्गांवर काम करणार्या कर्मचार्यांना पाहिले असेल. काम सुरू असलेल्या ठिकाणी दोन कर्मचारी दोन्ही बाजूने येणार्या गाड्यांवर लक्ष ठेवण्याकरिता हातात लाल झेंडे घेऊन उभे राहतात. मार्ग दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती त्या ठिकाणाहून जाणार्या गाडीच्या चालकासदेखील दिली जाते. मात्र, बहुतांश प्रसंगी झेंडे घेऊन उभे राहणारे रेल्वेचे कर्मचारी इंजिन ड्रायव्हरच्या दृष्टीस पडत नाहीत, आणि येथेच घात होतो. गेल्या तीन वर्षांंत मध्य रेल्वेच्या पाचही विभागात असे ६५५ अपघात घडले असून, त्यात ३३ रेल्वे कामगारांना आपला जीव गमवावा लागला. या गंभीर बाबीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुंबई विभागाने ५00 ग्रॅम वजनाचे उपकरण विकसित केले आहे. अत्यंत कमी वजन असल्याने सहज उचलून नेता येणारे हे उपकरण ज्या ठिकाणी देखभाल-दुरुस् तीचे काम सुरू आहे, त्याठिकाणी लावलं जातं. १२00 मीटरपर्यंत आलेल्या गाडीच्या स्पंदनांचा ठाव घेताच अलार्म वाजतो. केवळ हाताळणीच्याच नव्हे तर खर्चाच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत सोयीस्कर असल्याचे मत रेल्वेच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
रेल्वे मार्गांवर काम करणा-यांना मिळणार धोक्याची सूचना
By admin | Updated: May 16, 2015 00:46 IST