लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : अकोट नगर परिषदेमध्ये एका महिला नगरसेविकेच्या मुलाने कर्मचाऱ्याला दमदाटी करून मारहाण केल्याप्रकरणी अकोट शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीचा निषेध म्हणून कर्मचारी संघटनेने काळ्या फिती लावून आज कामबंद आंदोलन केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरसेविकाचा मुलगा चेतन कैलास मर्दाने याने आरोग्य विभागातील शिपाई सुनील बबन भागवत हा शासकीय कर्तव्यावर असताना शहरातील वराह पकडण्याच्या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली व मारण्याची धमकी दिली.सदर प्रकार १३ जून रोजी नगर परिषद आवारात घडला, अशी फिर्याद अकोट शहर पोलिसांत देण्यात आली. याप्रकरणी अकोट शहर पोलिसांत आरोपी चेतन कैलास मर्दाने याच्याविरुद्ध भादंवि ३५३, ३३२, ५०४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचा निषेध करीत नगर परिषद कर्मचारी संघटनेने आज काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन केले. वराहमुक्त अकोट शहर करण्याकरिता नगर परिषद गेल्या काही महिन्यांपासून मोहीम राबवित आहे. त्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याच वराह पकडण्याच्या कारणावरून नगर परिषदेमध्ये कर्मचाऱ्याला मारहाणीपर्यंत प्रकरण पोहोचले आहे.
नगरसेविकेच्या मुलाची कर्मचाऱ्याला मारहाण गुन्हा दाखल
By admin | Updated: June 14, 2017 02:06 IST