अकोला : बॉम्ब म्हटला की कुणाचीही घाबरगुंडी उडते. परिसरात बॉम्ब आहे, अशी वार्ता कानावर आली, तरी धावपळ उडते. प्रत्यक्षात बॉम्ब असो की नसो, प्रत्येकजण जीव मुठीत घेऊन पळतो. अकोल्यात बॉम्ब असल्याची अफवा सोमवारी पसरली.. पण चित्र मात्र थोडं वेगळंच होतं. घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी होती. प्रत्येकाच्या मनात उत्सुकता.. उत्कंठा आणि काहीशी भीती दिसून आली. बॉम्ब कसा असतो आणि कसा फुटतो, हे पाहण्यासाठी गर्दी करणार्या अकोलेकरांचा हा अजब निर्भीडपणा चर्चेचा विषय ठरला. अकोला शहराच्या मध्यभागी असलेल्या मुख्य पोस्ट ऑफीस चौकात सोमवारी दुपारी एका दुचाकीवर बेवारस सुटकेस आढळली. दुचाकीच्या मालकाने त्याच्या मित्राच्या माध्यमातून पोलिसांना पाचारण केले. घटनास्थळी उपस्थित काहींनी या सुटकेसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांना दिली. बॉम्ब म्हटल्यावर, पोलिस कामाला लागले. त्यांनी बॉम्ब निकामी करण्यासाठी श्वान पथक, स्कॅनर, मेटल डिटेक्टर आदी यंत्रणा घटनास्थळी सज्ज केली. अनुचित घटना टाळण्यासाठी लगेचच वाहतूक वळविण्यात आली. वाहतूक वळवून उपयोग काहीच झाला नाही, कारण तोपर्यंत हौशी बघ्यांनी तुफान गर्दी केली होती. या लोकांना उत्सुकता होती, ती बॉम्ब कसा असतो, ते पाहण्याची. पोस्टात कामानिमित्ताने आलेले काही नागरिक, विद्यार्थीही आपले हातचे काम सोडून बॉम्ब पाहण्यासाठी आले. एवढी गर्दी झाली असताना, पोस्टाचे कर्मचारी मागे कसे राहणार? त्यांनीही आपली हौस भागवून घेतली. पोस्ट ऑफिसमध्ये रांगेत उभे असलेले काही विद्यार्थी मात्र आपला नंबर जाईल, या भीतीने रांगेतून बाहेर पडले नाही. रांगेत उभे राहूनच ते घटनेची चौकशी करीत होते. बॉम्ब कसा असतो, हे एकट्याने पाहणे काहींना योग्य वाटले नाही. त्यांनी लगेचच आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना माहिती दिली आणि त्यांनाही बोलावून घेतले. अशातच काहींच्या मानगुटीवर व्हाटस् अँपचे भूत बसले. त्यांनी आपल्या मोबाईलवर फोटो घेणे आणि चित्रिकरण करणे सुरू केले. एकूणच प्रकार मोबाईल फोनमध्ये टिपण्यासाठी काही महाभाग तर पोस्टाच्या आवारभिंतीवर जाऊन उभे राहिले. फोटो काढताना आपण तोल जाऊन पडू शकतो, याचीही त्यांना पर्वा नव्हती. हौशी अकोलेकरांची गर्दी आवरण्यापलिकडे असली तरी, पोलिस यंत्रणा आपलं काम काळजीपूर्वक करीत होती. गर्दीत सुटकेस उघडण्याचा धोका पोलिसांनी पत्करला नाही. त्यामुळे बॉम्बनाशक पथकाने हुक बांधलेल्या एका दोरीच्या सहाय्याने बेवारस सुटकेस बाजूच्या महापालिकेच्या शाळेत ओढत नेली. स्कॅचने सुटकेस झटकली आणि उघडली असता, त्यातून कागदपत्रे, फोटो, स्टॅपलर, स्टँप आणि इंकपॅड आदी साहित्य बाहेर पडले. बॉम्बचा बार फुसका निघाल्याचे स्पष्ट झाले आणि बघ्यांची हिम्मत आणखी वाढली. या हौशी अकोलेकरांनी जवळून सुटकेस बघून, बॉम्ब नसल्याची खात्री स्वत: करून घेतली. खात्री पटल्यानंतर सर्वांनी जल्लोषही केला. एरव्ही कोणत्याही शहरात बॉम्बची अफवा पसरली तरी, परिसरात स्मशान शांतता पसरते. बॉम्ब पाहण्यासाठी तुफान गर्दी करणार्या अकोलेकरांना मात्र काय म्हणावं, हा प्रश्न येथे उपस्थित काही सुज्ञ नागरिकांनी केला.(प्रतिनिधी) ** काही क्षणासाठी रस्तेही थांबले एरव्ही मुख्य डाक कार्यालयासमोरील धावणारे रस्ते सोमवारी काही क्षणांपुरते का होईना थांबले होते. निमित्त होते बेवारस सुटकेसचे. सुटकेसमध्ये बॉम्ब असल्याचा संशय आणि पोलिसांची सुरू झालेली सर्च मोहिमेमध्ये नागरिकांच्या मनातही धस्स झाले. सुटकेसमध्ये बॉम्ब..बापरे..पोलिसांनीही संशयावरून मुख्य डाक कार्यालयाच्या समोरील नागरिकांना दूर केले. त्यामुळे संशयात अधिकच भर पडली. फोन सुरू झाले..बॉम्ब..बॉम्ब एकच चर्चा सुरू झाली. गर्दीत आणखी गर्दी वाढू लागली. घटना नक्कीच गंभीर आहे..याचा अंदाज घेतल्यावर बॉम्बशोधक पथकानेही पोलिसांना अशोक वाटिकेकडे जाणारा व बस स्टँडकडे जाणार्या रस्त्यांवरील वाहतूक २0 मिनिटे थांबून ठेवण्यास सांगितले. ** बेवारस सुटकेस, बॉम्बशोधक पथक व फोटोसेशन बेवारस सुटकेस आढळून आल्यानंतर काहीतरी घटना घडली असेल, असे समजून नागरिक पुढे जात; परंतु बॉम्बशोधक व श्वान पथक आल्यानंतर मात्र नागरिकांची उत्सुकता वाढली. सुटकेसमध्ये बॉम्ब असल्याचे गर्दीत कुणीतरी सांगताच सर्च मोहीम पाहायला नागरिक अधिकच उतावीळ झाले. बॉम्बशोधक व श्वान पथकासह त्या बेवारस बॅगचे मोबाईलद्वारे चित्रण करण्यासाठी नागरिक पुढे सरसावू लागले. ** 'ती' सुटकेस मुकुंद खैरे यांची बेवारस सुटकेसमध्ये बॉम्ब असल्याच्या संशयावरून पथकाने सुटकेस पन्नालाल खंडेलवाल शाळेच्या मैदानात नेली. सुटकेस उघडल्यावर त्यात समाज क्रांती आघाडीचे अध्यक्ष प्रा. मुकुंद खैरे यांची कागदपत्रे, काही छायाचित्रे व स्टॅम्प आढळले. सोमवारी समाजक्रांती आघाडीच्या धरणे आंदोलनात प्रा. खैरे सहभागी झाले होते. तेथून अज्ञात चोरट्याने त्यांची सुटकेस लंपास केली आणि ३५ हजार रुपयांची रोख काढून सुटकेस डाक कार्यालयासमोरील स्कूटरवर ठेवून पळ काढला.
बॉम्बचा फुसका बार !
By admin | Updated: August 5, 2014 20:08 IST