बोरगाव वैराळे : गतवर्षी अतवृष्टी व गारपिटीने अकोला जिल्हय़ातील शेतकरी गारद झाल्याने शासनाने डिसेंबर २0१४ पर्यंत शेतकर्यांच्या पीक कर्जावरील व्याजमाफी जाहीर केली आहे; परंतु काही बँका व्याजमाफीच्या आदेशांना हरताळ फासून शेतकर्यांकडून व्याजासह कर्ज वसूल करीत असल्याने बोरगाव वैराळे परिसरातील शेतकर्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे, सोनाळा, हातरूण, अंदुरा या परिसरातील गावांना गत पाच वर्षांपासून मोर्णा व पूर्णा नदीच्या पुरांचा फटका बसत आहे. त्यातच गतवर्षी खरीप हंगामात झालेलीअतवृष्टी व त्यानंतर रब्बी हंगामात झालेली गारपीट यामुळे परिसरातील शेतकरी गारद झाला. नुकसानीचा सर्व्हे करण्यात आला; परंतु मदत अजूनही मिळाली नाही. शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने डिसेंबर २0१४ पर्यंत व्याज माफी जाहीर केली. त्यामुळे शेतकरी जुळवाजुळव करून गतवर्षीच्या पीक कर्जाची मूळ रक्कम फेडण्यासाठी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक व राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जात आहेत. परंतु, या बँका शेतकर्यांकडून १0 टक्के व्याजासह कर्ज वसुली करीत आहेत. त्यामुळे शासनाच्या व्याजमाफीच्या घोषणेला बँका हरताळ फासत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत.यासंदर्भात अ.जि.म.स. बँकेचे निरीक्षक तायडे यांच्याकडून माहिती घेतली असता, ज्या शेतकर्यांनी रब्बीसाठी पीक कर्ज वाटप झाले आहे व ज्यांच्या रब्बी पिकांचे ५0 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे व हे नुकसान केवळ गारपिटीमुळेच झाले असेल, अशाच शेतकर्यांना व्याजमाफीची सवलत असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, बँक व शासनाच्या व्याज माफीच्या या अजब निकषांबाबत शेतकर्यांमध्ये संभ्रम असून, शासनाने सरसकट सर्वांनाच व्याजमाफी द्यायला हवी, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.
व्याजमाफीच्या आदेशाला बँकांची हरताळ
By admin | Updated: July 21, 2014 00:43 IST