अकोला : राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत शेतकर्यांकडून भरल्या जाणार्या विमा हप्त्याची (प्रिमियम) रक्कम जमा करण्याच्या कामात बँकांची हलगर्जी अजिबात चालणार नाही, असा खणखणीत इशारा देत, पीक विमा हप्त्याची रक्कम जमा करण्यात हलगर्जी करणार्या बँकांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री जयदत्त क्षीरसागर, जिल्हाधिकारी अरुण शिंदे, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रविप्रकाश दाणी, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.शालीग्राम वानखेडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे, जिल्हा पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र, मनपा प्रभारी आयुक्त दयानंद चिंचोलीकर, अपर जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे प्रामुख्याने उपस्थित होते. यावर्षी मान्सून लांबल्याच्या पृष्ठभूमीवर पीक विमा योजनेत सहभागी होणार्या शेतकर्यांकडून पीक विमा हप्त्याची रक्कम संबंधित बँकांमध्ये जमा केली जात आहे. पीक विमा उतरविणार्या शेतकर्यांना विम्याचा लाभ मिळावा, यासाठी शेतकर्यांकडून भरल्या जाणारी पीक विमा हप्त्याची रक्कम बँकांनी तातडीने जमा करून घ्यावी, या कामात ज्या बँका टाळाटाळ आणि हलगर्जी करतील, अशा बँकांवर आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिल्या. गतवर्षीच्या खरीप हंगामात बँक ऑफ महाराष्ट्रच्या आकोट येथील शाखेने शेतकर्यांनी भरलेल्या पीक विमा हप्त्याची रक्कम उशिरा जमा केल्याने, संबंधित शेतकर्यांचे नुकसान झाले. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्रच्या आकोट येथील शाखेविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही अजित पवार यांनी कृषी विभागाला दिले. २0१३ मधील खरीप हंगामात राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील ६२ हजार ५४३ शेतकर्यांसाठी पीक नुकसान भरपाईपोटी २७ कोटी ७ लाख २१ हजार ५0५ रुपये पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. पीक विम्याची ही मंजूर रक्कम येत्या सात दिवसांत शासनामार्फत जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली. पाऊस, खरीप पेरण्या, धरणांमधील उपलब्ध जलसाठा, योजना आणि विकासकामांचा आढावादेखील उपमुख्यमंत्र्यांनी घेतला. जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी ह्यपॉवर पॉइंट प्रेझेंटेशनह्णद्वारे जिल्हय़ातील विविध योजना व विकासकामांसह आवश्यक सर्वच माहिती उपमुख्यमंत्र्यांना दिली. यावेळी अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, उपजिल्हाधिकारी प्रमोद देशमुख, एम.डी.शेगावकर, दुबे, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.
हलगर्जी केल्यास बँकांवर फौजदारी कारवाई !
By admin | Updated: August 4, 2014 00:55 IST