अकोला : महापौर, उपमहापौर पदासाठी प्रत्येकी आठ इच्छुक उमेदवारांनी महापालिकेचे नगर सचिव अनिल बिडवे यांच्याकडे नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) सादर केले. शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १६ उमेदवारांचे २२ अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले. भाज पच्यावतीने एकमेव उज्ज्वला देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. दुसरीकडे अर्ज भरणार्यांमध्ये काँग्रेस आणि अपक्षांमधून गर्दी झाली आहे. महापौर पदाचा कालावधी येत्या ९ सप्टेंबर रोजी संपुष्टात येत असल्याने नवीन महापौर निवडीसाठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण निघाल्याने सर्वच पक्षांच्या इच्छुक नगरसेविका पुढे सरसावल्या. ६ सप्टेंबर रोजी महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासूनच इच्छुकांमध्ये लगबग दिसून आली. सर्वात पहिला अर्ज उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मो.फजलू यांच्यावतीने सादर करण्यात आला. तर सर्वात शेवटचा अर्ज शिवसेनेच्या इच्छुकांनी सादर केले. महापौर पदासाठी विरोधीपक्ष भाजपच्यावतीने नगरसेविका उज्ज्वला देशमुख यांनी अर्ज दा खल केला. राकाँच्यावतीने शमशाद बेगम शे.फरीद यांनी अर्ज दाखल केला आहे. भारिप- बमसंसोबत सत्तेत असलेल्या काँग्रेसच्यावतीने निहकत शाहीन अफसर कुरेशी, शाहीन अंजूम महबूब खान, साफीया आझाद खान, शे.रिजवाना अजीज शेख अजीज तसेच जैनबबी शेख इब्राहीम या पाच नगरसेविकांसह अपक्ष नगरसेविका हाजरा बी अब्दुल रशीद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महापौर पदासाठी आठ उमेदवारांकडून १२ अर्ज प्राप्त झाले. याप्रमाणेच उपमहापौर पदासाठी राकाँचे मो.फजलू अ.करीम, राजू मुलचंदानी, प्रफुल्ल भारसाकळ, समाजवादी पार्टीच्यावतीने नकीर खान, भारिप-बमसंच्यावतीने धनश्री अभ्यंकर तसेच शिवसेनेच्यावतीने विनोद मापारी, गायत्रीदेवी मिश्रा, योगिता पावसाळे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. आठ उमेदवारांकडून दहा अर्ज प्राप्त झाले. येत्या १0 सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजता मनपाच्या मुख्य सभागृहात प्राप्त अर्जांंची छाननी केल्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होईल.
** राकाँच्या सभागृह नेत्याला सुचक मिळेना!
राकाँचे सभागृह नेता राजू मुलचंदानी यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज सादर केला. अर्जावर सुचक,अनुमोदकाचे नाव क्रमप्राप्त असल्याने त्यांनी भारिपचे गटनेता गजानन गवई यांना गळ घातली; परंतु पक्षश्रेष्ठींचा आदेश नसल्यामुळे गवई यांनी मुलचंदानी यांना नकार दिला. परिणामी सुचक, अनुमोदक शोधण्यासाठी सभागृह नेत्याला चांगलीच धावपळ करावी लागल्याची माहिती आहे.
** शिवसेनेचे वरातीमागून घोडे
उपमहापौर पदासाठी ३0 टक्के आर्थिक खर्च व उमेदवार निवडीवरून शिवसेनेत चांगलीच माथापच्ची झाली. आमदार बाजोरिया यांच्या कार्यालयात ही बैठक सायंकाळपर्यंत चालली. जो खर्च करेल, तो उपमहापौर होईल, असा निर्णय मुंबईतील काही वरिष्ठांनी घेतला. अ खेर सायंकाळी ४.४५ वाजता शिवसेनेच्या इच्छुकांनी मनपाकडे अर्ज दाखल केले. यादरम्यान, हा खर्च नेमका कोणाच्या खिशात जाईल, यावर सेना नगरसेवकांमध्ये कुजबुज सुरू होती.
** पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा विचार करा
विरोधीपक्ष भाजपमधून सुमनताई गावंडे, उज्ज्वला देशमुख, सुनीता अग्रवाल, गीतांजली शेगोकार व सारिका जयस्वाल आदी महिला नगरसेविकांची नावे चर्चेत होती. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उमेदवार निवडीवर खल पाडल्यानंतर कॉटन मार्केटमधील कार्यालयात पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढलेल्या अधिकृत उमेदवारांना प्राधान्य दिले पाहिजे, यावर एकमत करण्यात आले. यामधून उज्ज्वला देशमुख यांचे नाव निश्चित करण्यात आले. अर्थातच हा रोख अपक्ष सुनीता अग्रवाल यांच्याकडे असल्याची चर्चा मन पा वतरुळात सुरू होती.
** काँग्रेसचा निर्णय प्रदेशाध्यक्षांच्या दालनात
काँग्रेसच्यावतीने प्रामुख्याने अल्पसंख्याक समाजाच्या नगरसेविकांनी उमेदवारी अर्ज सादर केले. पाच नगरसेविकांनी इच्छा प्रकट केल्याने स्थानिक पदाधिकार्यांनी हा तिढा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे सोडवतील, अशी भूमिका घेतली आहे.