नितीन गव्हाळे / अकोला: कुष्ठरोग अर्थात महारोग, जिवंतपणी मनुष्याला मरणयातना देणारा हा भयानक आजार. या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असले तरीही कुष्ठरोगाच्या जाळय़ात अनेक नागरिक ओढल्या जात आहेत. पश्चिम विदर्भातील पाचही जिल्हय़ांमध्ये गतवर्षात १२0९ नवीन कुष्ठरोगी रुग्ण आढळून आहेत. यात सर्वाधिक रुग्ण अमरावती व यवतमाळ जिल्हय़ात असल्याची माहिती कुष्ठरोग विभागाचे अवैद्यकीय पर्यवेक्षक एस.पी. देशमुख यांनी दिली. कुष्ठरोग निवारणासाठी आरोग्य विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येतात; परंतु कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यात अपयश येत आहे. कुष्ठरोग प्रामुख्याने विकृतीसाठी ओळखला जातो. शरीराचे तीन अवयव कुष्ठरोगामुळे प्रभावित होतात. हाताचे व पायाचे पंजे आणि डोळय़ांना कुष्ठरोगामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते. या आजारामुळे व्यक्ती जिवंत असूनही मेल्यासारखाच बनतो. त्याच्या वाट्याला कुटुंब, नातेवाईक आणि समाजाकडून उपेक्षाच येते. शरीरावर कोणताही चट्टा असेल तर तातडीने डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केलेली उपयोगाचे ठरते. शरीरावर पाचपेक्षा अधिक चट्टे असतील तर तो रुग्ण सांसर्गिक म्हणून ओळखला जातो. पाचपेक्षा कमी चट्टे असतील तर असांसर्गिक अशी व्याख्या कुष्ठरोग विभागाने केली आहे. शरीरावर चट्टे दिसून आल्यावरही त्याकडे दुर्लक्ष केल्यास घातक ठरू शकते. हाता, पायांना विकृती येईपर्यंंत फार उशीर झालेला असतो, त्यामुळे नागरिकांनी वेळीच खबरदारी घेऊन योग्यवेळी उपचार केल्यास कुष्ठरोग पूर्णत: बरा होऊ शकतो. आरोग्य विभागाच्या उपाययोजना आणि औषधोपचार उपलब्ध असल्यानंतरही पश्चिम विदर्भात दरवर्षी कुष्ठरोगाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामागे नागरिकांची उदासीनता हे प्रमुख कारण आहे.
पश्चिम विदर्भात कुष्ठरोगाचे १२00 नवीन रुग्ण!
By admin | Updated: February 4, 2016 01:26 IST