अकोला: जिल्ह्य़ातील गोरेगाव बु. येथे हायड्रोसील (अंडवृद्धी) रुग्णांची संख्या शंभरावर असून, गावकर्यांसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे. हा आजार कशामुळे बळावला, याबाबत अनेक कारणे सांगण्यात येत आहेत. मात्र उपाययोजना करण्यास आरोग्य विभाग अपयशी ठरल्याचे दिसत आहे. गोरेगावात क्षारयुक्त पाण्यामुळे किडनी आणि पत्री आजाराने थैमान घातले आहे. ३० पेक्षा जास्त लोक सद्यस्थितीत बाधित आहेत. या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या आजारासोबत अनेक तरुणांना हायड्रोसीलने ग्रासले आहे. सद्यस्थितीत ११२ पेक्षा जास्त रुग्ण गावात आहेत. क्षारयुक्त पाणी आणि मच्छरांचे प्रमाण यामुळे दूषित झालेल्या रक्तामुळे अंडकोषाच्या आवरणात पाणी जमा होते. त्यातून हायड्रोसील हा आजार होतो. तीन हजार लोकसंख्या असलेले हे गाव सध्या या आजाराच्या विळख्यात सापडले आहे. या विचित्र आजाराने गावातील तरुणांचे भवितव्य धोक्यात आले आहे. अनेक तरुणांचे वैवाहिक जीवन यामुळे संपुष्टात आले आहे. लहान मुलापासून वृद्धांपर्यंतचे रुग्ण गावात आहेत. गावकर्यांना आरोग्य विभागाकडून वेळेवर मार्गदर्शन मिळाले नाही, त्याचा परिणाम म्हणून या आजाराच्या रुग्णांची संख्या घटण्याऐवजी वाढली आहे. हायड्रोसील हा आजार एकदम होत नसून हळूहळू अंडकोषाचा आकार वाढत जातो. या आजारावर शस्त्रक्रिया हाच उपाय आहे. गोरेगावातील काही तरुणांना हर्निया (अंतर्गळ, अंत्रवृद्धी) आजार झालेला आहे. हायड्रोसील आणि हर्निया हे दोन वेगवेगळे आजार आहेत. हर्निया आजाराने जांगेत सूज (फुगा) येते. पोटाची चरबी त्या रस्त्याने बाहेर येते. ही चरबी झोपताना कमी होते तर खोकलताना पुन्हा चरबी बाहेर येते. हा आजार जन्मताच असून, याला क्षारयुक्त पाणी कारणीभूत नाही. क्षारयुक्त पाण्यामुळे किडनी आजाराबरोबरच पत्री, किडनी स्टोन, पोटाचे विकार होण्याची दाट शक्यता असते. तर मच्छरांचे प्रमाण जास्त असल्यास हायड्रोसील थायलेरिया होतो. अंडवृद्धीत वाढ झालेले एका घरात तीन-तीन रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने या ठिकाणी आरोग्य तपासणी कॅम्प सुरू केल्यास अनेकांचे निदान होऊ शकते.
गोरेगावात हायड्रोसीलचे ११२ रुग्ण
By admin | Updated: May 15, 2014 19:44 IST