मागील वर्षी मार्चपासून कोरोनाचा शिरकाव नगर जिल्ह्यात झाला. पुढे एक एक करत कोरोनाने गावामध्ये ही दखल दिली. बाहेर जिल्ह्यातून, राज्यातून गावात आलेल्या लोकांनी कोरोना गावात आणला. परंतु याही स्थितीत अनेक गावांनी प्रसंगी कठोर निर्णय घेऊन नियमांची कडक अंमलबजावणी करून कोरोनाला वेशीवरच रोखले. नगर जिल्ह्यात मागील वर्षी कोरानाचा एकही रुग्ण नसलेली सुमारे दीडशे ते दोनशे गावे होती. यंदा मात्र या सर्वच गावांमध्ये कोरोना पसरला आहे. ही गावे कोरोनाला थोपविण्यात अपयशी ठरली. एक तर या वेळच्या संसर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि दुसरीकडे जे निर्बंध आहेत ते मागील प्रमाणे कडक नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ नियम पाळताना दिसत नाहीत. अशी अनेक कारणे कोरोना पसरण्यास सांगितली जात आहेत.
---------------
जिल्ह्यातील एकूण गावे - १३१८
सध्या कोरोना रूग्ण असलेली गावे - १३१८
----------------
दुसऱ्या टप्प्यात ही गावे वेढली
नगर तालुक्यातील खांडके, माथनी, रांजणी, बाळेवाडी, जांब, पांगरमल, पिंप्री घुमट, नांदगाव, मठपिंप्री, हातवळण, साकत, पारगाव मौला, वाटेफळ, पिंपळगाव वाघा आदी चौदा गावे पहिल्या लाटेत कोरोनामुक्त होती परंतु आता या सर्व गावांमध्ये कोरोना पोहोचला आहे.
---------------
साकत येथे दुसऱ्या लाटेत तीन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये ४८ पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले. दुसऱ्या लाटेत काही रुग्णांनी आजार लपवून ठेवला. त्यांच्यापासून अनेक जण बाधित झाले. गावातील नागरिकांना रुईछत्तीसी येथे गर्दी असल्यामुळे लस घेण्यास अडचणी येत असून गावातच लसीकरण होण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
- बाबासाहेब चितळकर, उपसरपंच साकत खुर्द, ता. नगर
-------------
पहिल्या लाटेच्या वेळेस लोक घाबरत होते. मात्र आता बिनधास्त फिरत आहेत. संध्याकाळी तर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. लस घेतल्यामुळे आम्हाला काही होणार नाही, असा त्यांचा समज झाला आहे.
-मंडाबाई शिंदे, सरपंच, पिंपळगाव वाघा, ता. नगर
------------------
पहिल्या लाटेत शासनाने कडक लॉकडाऊन केला होता. नियमही कडक होते. मात्र या वेळेस ते नियम शिथिल झाले क्वारंटाईन, पद्धत होती यंदा उशिरा निर्णय झाला. शाळेत क्वारंटाईन केले जात होते. तत्काळ कोविड सेंटरला पाठवत होते. आता नागरिक कोरोना झाला तरी घरीच थांबत आहे. तपासणी वेळेवर होणे गरजेची होती. यामुळे संख्या वाढत आहे.
सुनीता सरक, सरपंच, नांदगाव, ता. नगर
---------------
कोरोनाचा शिरकाव झालेली व कोरोनाला वेशीवरच रोखणाऱ्या गावांची माहिती काढावी लागेल. कोरोनाविरुद्धच्या लढाईमुळे ही आकडेवारी उपलब्ध नाही, मात्र एक दोन दिवसात ती काढता येईल.
- डॉ. मोहन शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी, श्रीरामपूर
-------------
(डमी)