बुधवारी (दि. २६) येथील यशोधन जनसंपर्क कार्यालयात विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. तांबे बोलत होते. काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, प्रा. बाबा खरात, नगरसेवक नितीन अभंग, रमेश गुंजाळ आदी उपस्थित होते.
डॉ. तांबे म्हणाले की, विविध प्रश्नांची जाण असणारे दिवंगत विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. विकास कामांची दूरदृष्टी, तत्परता, हसतमुख स्वभाव यामुळे राज्यातील जनतेच्या मनावर त्यांनी अधिराज्य केले. विलासराव देशमुख यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर व संगमनेर तालुक्यावर खूप प्रेम केले. त्यांनी महसूलमंत्री थोरात यांना लातूर, उस्मानाबाद चे १२ वर्षे पालकमंत्री पद दिले. संगमनेर तालुका हा काँग्रेस पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिलेला आहे. संगमनेर तालुक्यातील अनेक ऐतिहासिक योजना पूर्ण करताना विलासराव देशमुख यांनी मोठे सहकार्य केले होते. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी निळवंडे धरणातून थेट पाइपलाइन योजना त्यांच्याच काळात मंजूर झाली होती, असेही तांबे म्हणाले. प्रास्ताविक प्रा. खरात यांनी केले. जिल्हाध्यक्ष झावरे यांनी आभार मानले.