शेवगाव तालुक्यातील ठाकूर निमगाव, कांबी परिसरातील काही शेतकऱ्यांनी सन २०२०-२१ या गळीत हंगामात संगमनेर तालुक्यातील श्री गजानन महाराज (युटेक) शुगर लि. कारखान्याला ऊस दिला. मात्र, सहा महिने उलटूनही या ऊसाचे पेमेंट शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून या कारखान्यास तातडीने ऊसाचे पेमेंट संबंधितांच्या बँक खात्यात वर्ग करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे व जनशक्ती मंचचे ॲड. शिवाजीराव काकडे यांनी केली आहे. याबाबत काकडे यांनी गुरुवारी नगरला प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी संजय आंधळे, अकबर शेख, भागवत रासनकर, नारायण क्षीरसागर, राजू म्हस्के, अशोक तापकीर, गणेश होळकर, सौरभ राजपूत, भाऊसाहेब घोलप, नामदेव माने, पांडुरंग झिरपे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी वेळोवेळी ऊस पेमेंटबाबत विचारणा केली असता कारखाना प्रशासनाकडून नेहमी उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना इतर कारखान्यानुसार २११० रुपये प्रमाणे व्याजासह पेमेंट मिळावे. सध्या शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व महापुराने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हक्काचे ऊसाचे पेमेंट देणे गरजेचे आहे. मुळात १४ दिवसांत किमान एफआरपीप्रमाणे पेमेंट अदा करणे प्रत्येक कारखान्यास बंधनकारक आहे. या कालावधीत रक्कम अदा न केल्यास व्याज आकारण्याची तरतूद आहे. त्यामुळे तातडीने लक्ष घालून आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वर्ग करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा सर्व शेतकरी आपल्या साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करतील, असा इशारा काकडे यांनी दिला आहे.
---------
फोटो - १६काकडे निवेदन
युटेक साखर कारखान्याने शेवगाव तालुक्यातील ऊस उत्पादकांचे थकित पेमेंट तातडीने द्यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे व ॲड. शिवाजीराव काकडे यांनी साखर सहसंचालकांकडे निवेदनाद्वारे केली.