अहमदनगर: शासकीय जमिनीचा ताबा महापालिकेला मिळावा असा प्रस्ताव गत आठ वर्षापासून शासकीय दरबारी लालफितीत अडकला आहे. आता ही जमीन ताब्यात मिळावी यासाठी महापौर संग्राम जगताप व उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. केडगाव परिसरातील वखार महामंडळाची (पाच गोदाम) १ हेक्टर ६७ आर जागेवर खेळाचे मैदान, बहुउद्देशीय सभागृह, वाहनतळ, ग्रंथालय व भाजी मार्केटचे आरक्षण नगर शहर प्रारूप विकास योजना (वाढीव क्षेत्र) आराखड्यात टाकले. तत्कालीन महापौर संदीप कोतकर यांनी तसा ठराव महासभेत पारित करून घेतला. त्यानंतर ही जागा महापालिकेच्या ताब्यात मिळावी अशी मागणी करणारा प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर नगर प्रांताधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला. नंतर तो प्रस्ताव लालफितीत अडकला गेला. आठ वर्षे झाले तरी अजूनही ही जागा महापालिकेच्या ताब्यात मिळालेली नाही. केडगाव उपनगराचा विकास झपाट्याने झाला आहे. त्यामुळे उपनगरात भाजी विक्रेते रस्त्यावर बसतात. वाहन पार्किंगही रस्त्यावरच होते. त्यामुळे ही जागा ताब्यात मिळाली तर तेथे भाजी मार्केट, वाहन तळ उभारून हे प्रश्न मार्गी लागणार आहेत,ही बाब जगताप, कोतकर यांनी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या निदर्शनास आणून दिली. नगरसेवक सुनील कोतकर, सविता कराळे, सुनीता कांबळे, कुरेशी, दिलीप पवार यावेळी उपस्थित होते. वैयक्तिक लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी कवडे यांनी महापौर जगताप व उपमहापौर कोतकर यांना दिले. (प्रतिनिधी)
हस्तांतरणाचा प्रस्ताव लालफितीत!
By admin | Updated: June 18, 2014 01:22 IST