अहमदनगर : जिल्ह्यात टंचाईची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सध्या १८९ गावे आणि ८१८ वाड्या-वस्त्यांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागते आहे. तब्बल २४७ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी अवघ्या १५ गावांत टंचाई होती. आजअखेर पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक टंचाई आहे. तेथे ३८ गावे व १२८ वाड्यांना टँकरने पाणी दिले जात आहे. जिल्ह्यात ४ लाख ३४ हजार ६६१ लोकांना टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. जिल्ह्यात श्रीरामपूर आणि राहुरीत एकही गाव टंचाईग्रस्त नाही. श्रीगोंदा व नेवाशात प्रत्येकी दोन गावे टंचाईग्रस्त आहेत. एकूण २४७ पैकी २४ शासकीय व २२३ टँकर हे खासगी आहेत. जून महिन्यात पावसाला सुरूवात झाल्यास त्याचा फायदा होणार असून टँकर कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांचा डोळा आकाशाकडे लागला असून सर्वांना पावसाची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी) जिल्ह्यात टंचाई वाढल्याने खासगी विहिरी, कुपनलिका अधिग्रहित केल्या आहेत. टंचाई काळात टँकरची मागणी वाढत असल्याने सरकारने ते त्वरित मिळावे यासाठी तहसीलदारांना मंजुरीचे आदेश दिले आहेत. संबंधित गावांमध्ये मागणीप्रमाणे रोहयोची कामेही मंजूर केली आहेत. -अनिल कवडे, जिल्हाधिकारीमंगळवारी सायंकाळी जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाला सुरू झाली असून त्याचा फायदा होणार असल्याची शक्यता आहे. यंदाच्या उन्हाळ्यात राहुरी आणि श्रीरामपूर तालुका लकी ठरला असून या ठिकाणी एकही टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली नाही. संगमनेर - ३८, अकोले - ७, कोपरगाव ७, नेवासा - ४, राहाता ७, नगर - ३९, पारनेर - २३, पाथर्डी -५७, शेवगाव - १९, कर्जत - २३, जामखेड - २१, श्रीगोंदा -२.
हजार गावे टँकरवर
By admin | Updated: June 5, 2014 00:07 IST