गुरुवारी सरपंचपदासाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती. त्यानंतर हा पेच समोर आला. तहसील कार्यालयाने छाननी केल्यानंतर या ठिकाणी संबंधित प्रवर्गाचा उमेदवार नसल्याचे स्पष्ट झाले. या ग्रामपंचायतींमध्ये गोवर्धनपूर, मांडवे घुमनदेव, लाडगाव, मातुलठाण आणि कुरणपूर यांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत पाटील यांनी या माहितीला दुजोरा दिला.
यातील गोवर्धनपूर, मांडवे, कुरणपूर व मातुलठाण येथे अनुसूचित जातीकरिता सरपंचपद आरक्षित झाले होते. मात्र, तेथे अनुसूचित जातीचे उमेदवार नसल्याचे सोडतीनंतर समजले. घुमनदेव व लाडगाव येथे सर्वसाधारण महिलेकरिता सरपंचपद जाहीर झाले. या दोन्ही ठिकाणी महिला उमेदवार नाहीत. त्यामुळे गुंता वाढला आहे.
सहा ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागविणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी यांचा अभिप्राय घेऊनच पुढील कार्यवाही केली जाणार आहे, असे ते म्हणाले. सरपंचपदाचा तिढा फेर सोडत काढून सोडविणार की, चिठ्ठी टाकून सरपंच निवड होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
सरपंचपदासाठी अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून असतात. या सहा ठिकाणी मात्र संबंधित प्रवर्गाचा उमेदवार नसल्याची घटना घडली आहे. त्यामुळे इतर प्रवर्गातील उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आपल्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडेल, असे स्वप्न अनेकजण बाळगून आहेत.
------------