आंबी खालसा व खंदरमाळ परिसरातून चोरट्यांनी पुन्हा दोन दुचाकींची चोरी केली. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रविवारी (दि.२१) खंदरमाळ शिवारातील एकोणवीस मैल येथून एका मंगल कार्यालयासमोरून विलास कोंडाजी खंडागळे यांची दुचाकी (एम.एच.१७, क्यू. ९१७५) ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली. खंडागळे यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, दुचाकी मिळून आली नाही. याबाबत खंडागळे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शनिवारी (दि.२७) गणेश पांडुरंग पोपळभट (रा.घारगाव ) यांची (क्रमांक एम.एच.१७, बी.बी. ६२१८) दुचाकी आंबी खालसा येथील त्यांच्या दुकानासमोरून चोरून नेली. त्यांनीही दुचाकीचा शोध घेतला असता, दुचाकी मिळून न आल्याने घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेंद्र लांघे हे करीत आहेत.
सात दिवसात दोन दुचाकींची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:24 IST