अहमदनगर : शालेय शिक्षण संचालनालय यांच्याकडून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. हा विषय शिक्षण समितीच्या सभेत चर्चेला असताना कारवाई ऐवजी संबंधित शिक्षकाला निलंबित करण्याचा ठराव घेण्यात आला आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी शिक्षण समितीची मासिक सभा पार पडली. यात हा ठराव घेण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी बिडी, सिगारेट, तंबाखूसारखे धूम्रपान करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करवी, असे आदेश शालेय शिक्षण संचालनालयाने दिले होते. या आदेशाची माहिती शिक्षण समितीच्या बैठकीत देण्यात आली. यावेळी संबंधित शिक्षकांवर कारवाई ऐवजी निलंबन करण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या ५ वी ते ८ वी पर्यंतच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षेची फी भरण्यासाठी जिल्हा परिषदेने २० लाख रुपयांची तरतूद केली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच ८ वीचे वर्ग असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये राज्य परीक्षा परिषदेने प्रसिध्द केलेल्या मार्गदर्शिका उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी सांगितले. सभेला सदस्य संभाजी दहातोंडे, नंदा भुसे, प्रवीण घुले, सुरेखा राजेभोसले, मिनाक्षी थोरात यांच्यासह शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले, सुनंदा ठुबे, उपशिक्षणाधिकारी अंकु श जंजीरे, गुलाब सय्यद आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेच्या काही शाळांना हरिजन वस्ती शाळा असे नाव आहे. या ठिकाणी सामाजिक सलोखा राखण्यासाठी जिल्ह्यातील हरिजन वस्ती शाळा असे नाव असणाऱ्या शाळांचे नाव बदलण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या शाळांना त्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे प्रस्ताव आणि ठराव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले.
धूम्रपान करणाऱ्या शिक्षकांचे निलंबन
By admin | Updated: September 28, 2016 00:01 IST