विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव व घुटेवाडी येथील नागरिकांना कोरोना लस घेण्याची इच्छा आहे. मात्र, केवळ गावात अथवा गावाजवळ लसीकरणाची सोय नसल्याने ते लसीकरणापासून वंचित आहेत.
सुरेगाव हे गाव विसापूरपासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. तेथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून, ते कोळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आहे. कोळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र सुरेगावपासून दहा किलोमीटर अंतरावर असून, त्या ठिकाणी जाण्यासाठी मधला लगडवाडीमार्गे रस्ता अत्यंत खराब आहे. वयोवृद्ध नागरिकांना त्या ठिकाणी जाण्यासाठी कसरत करावी लागते. एवढे करूनही त्याठिकाणी गेल्यावर पहाटेपासून रांगा लागलेल्या असतात. त्या ठिकाणी कधीकधी आठवड्यातून एकदा लसीचे दोन-तीनशे डोस येतात. कोळगावची लोकसंख्या पाहता स्थानिक नागरिकांचाच लसीकरणासाठी नंबर लागत नाही. काही नागरिक जवळ सहा किलोमीटर अंतरावरील पिंपळगाव पिसा प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी जातात. मात्र, त्या ठिकाणचीही परिस्थिती फारशी वेगळी नाही. सुरेगाव उपकेंद्राला जोडलेले मुंगूसगाव हे गाव तर विसापूरपासून हाकेच्या अंतरावर व पिंपळगाव पिसापासून तीन किलोमीटर अंतरावर असताना कोळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडण्यात आले आहे. या सर्व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून व लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात होणारी गर्दी टाळण्यासाठी काही ठिकाणी मध्यवर्ती गाव पाहून लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सुरेगाव येथील उपकेंद्रात लसीकरण सुरू करावे अथवा विसापूर येथे लसीकरण करण्याबाबत आरोग्य विभागाने विचार करावा, अशी मागणी कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी साखर कारखान्याचे संचालक अंकुशराव रोडे, सरपंच मंगल रामफळे, माजी सरपंच सर्जेराव रोडे, माजी उपसरपंच गुलाब रामफळे, डॉ. अनिल मोरे यांनी केली आहे.
----
सध्या लस उपलब्ध होण्याचे प्रमाण कमी असल्याने फक्त प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू आहे. लस उपलब्ध होताच प्रत्येक उपकेंद्रात लसीकरण सुरू करण्याचे आरोग्य विभागाचे नियोजन आहे. येत्या काही दिवसांत विसापूर येथे लसीकरण करण्याबाबत प्राधान्याने प्रयत्न केले जातील.
-डॉ. नितीन खामकर,
तालुका आरोग्य अधिकारी, श्रीगोंदा.