सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीचे मोठमोठ्या उद्योगांना आकर्षण आहे. त्यामुळे येथे मोठे उद्योग येत असून एमआयडीसी विस्ताराच्या तिसऱ्या टप्प्यात २ हजार ९० हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. तशी अधिसूचनाही निघाली आहे. या माहितीला एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनीही दुजोरा दिला आहे.
नगर-पुणे हा चारपदरी रस्ता, शंभर किलोमीटरवर विमानतळ, १० ते १२ किलोमीटरवर विसापूर रेल्वेस्टेशन अशा जलद वाहतूक व दळणवळण सुविधेबरोबरच, दुष्काळी पट्ट्यातील क्षेत्र, होतकरू तरुणांची संख्या मुबलक, कुशल मनुष्यबळ, मुळा जलाशयातून आलेले पाणी, वसाहतीअंतर्गत झालेले चकाचक रस्ते, विजेची व्यवस्था अशा काही सुपा एमआयडीसीच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे येथे उद्योजक प्राधान्य देत आहेत.
ग्रामीण भागात उद्योजकांना काही सवलती मिळत असल्याने कारखानदारी वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा औद्योगिक विकास महामंडळाचा प्रयत्न असल्याचे नितीन गवळी यांनी सांगितले. उद्योगाच्या जोरावर केवळ पैसा कमवायचा असा हेतू न ठेवता या भागातील जनजीवन सुधारण्यासाठी त्यांच्या विकासासाठी काहीतरी योगदान देण्याची तयारी असणारे उद्योजक आहेत. परंतु, काही बाहेरील इच्छुक उद्योजक येथे येताना काही बाबींची पडताळणी करतात. स्थानिक उद्योजक, कारखान्यातील कामगार, प्रशासनातील लोक, स्थानिक नागरिक यांच्याकडून सर्व्हे करून मग निर्णय घेणारी काही उद्योजकमंडळी ठेकेदारीसाठी चाललेला संघर्ष, आंदोलने, दहशत त्यामुळे इकडे फिरकत नसल्याची माहिती समोर आली आहे.
विस्तारित एमआयडीसीच्या पहिल्या टप्प्यात ९३४.३४ हेक्टर भूसंपादन करावयाचे असून यापैकी ५८०.६४ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांनी दिली. दुसऱ्या टप्प्यात बाबूर्डी व पळवे भागातील २८७.४ हेक्टर जमीन घेण्यात येणार आहे. त्यासाठी होणाऱ्या विरोधामुळे तेथील संपादनप्रक्रिया रखडली. आता तिसऱ्या टप्प्यासाठी हंगा व सुपा येथील अनुक्रमे ७५८.१ व ८०.६८ हेक्टर अशी एकूण ८६८.६९ हेक्टर जमीन अधिग्रिहत करण्यात येणार असून त्यासाठी कार्यवाही सुरू झाल्याचे भोसले यांनी सांगितले.
त्यानुसार शेतकऱ्यांना आपले म्हणणे मांडावयाचे असून नंतर संयुक्त मोजणी होईल. त्यावर ३२ (१) ची सूचना निघेल. अधिग्रहणाच्या पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना हेक्टरी ५० लाख रूपये मोबदला दिला असल्याचे विभागीय अधिकारी नितीन गवळी यांनी सांगितले.
चौकट....
कोरोनाकाळात कारखान्यांची मदत
विस्तारित सुपा एमआयडीसीत सध्या कॅरीअर मायडिया, मिंड, केएसपीजी असे मोठे कारखाने आहेत. जाफा, इपिटॉम, गणराज इस्पात, आम इंडियासारख्या जुन्या एमआयडीसीतील कारखान्यांनी कोरोना काळात फूड पॅकेट, थर्मल स्कॅनर, ऑक्सिमीटर आदी मदत करून रोजगार बाधित व रुग्णांना मदत केली. कॅरीअर मायडियासारख्या कारखान्याने सीएसआर फंडातून जवळपास ८० लाख रुपयांचा निधी दिल्याने आरोग्य तपासणीसाठी लागणारी उपकरणे, विद्यार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली.