निघोज : पारनेर तालुक्यातील निघोजच्या सरपंचपदी सुधामती कवाद की चित्रा वराळ यापैकी कोणाची वर्णी लागणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. की ऐनवेळी एखादे नवेच नाव पुढे येणार याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. कोणत्याही गटाला स्पष्ट बहुमत नसल्याने काही सदस्य सहलीवरही गेले आहेत.
येथील सरपंचपदासाठी सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये आमदार नीलेश लंके समर्थक माजी सरपंच ठकाराम लंके यांच्या पॅनलला चार, खासदार डॉ. सुजय विखे समर्थक सचिन वराळ पॕॅनलला आठ जागा, मोरवाडी-रसाळवाडीचे अपक्ष तीन, तिसरी आघाडी दोन जागा, असे बलाबल आहे. वराळ गटाला सरपंचपद मिळविण्यासाठी एक उमेदवार कमी आहे.
सरपंच ठकाराम लंके, तिसरी आघाडी, रसाळ व मोरवाडी येथील उमेदवार एकत्र येऊन ते सहलीवर गेले आहेत. सर्व पॕॅनल प्रमुख एकमेकांची नाराजी काढण्यात गुंतले असताना काही जण सर्व गटांनी जमविलेली गणिते बिघडतील कशी यासाठी देव पाण्यात ठेवून आहेत. विधानसभा निवडणुकीत लंके व वराळ गटाने आमदार नीलेश लंके यांना मदत केली होती. त्यामुळे या निवडणुकीत आमदार लंके यांनी लक्ष घातले नाही. मात्र आता सरपंचपद निवडणुकीत आमदार लक्ष घालतात का याकडे सर्वांचे लक्ष आहे. लंके यांनी ग्रामपंचायतीवर झेंडा आमच्या विचाराचाच फडकेल, असे जाहीर केले आहे. लंके यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन माजी सरपंच ठकाराम लंके यांच्याबरोबरही चर्चा केल्याचे समजते. तसेच खासदार विखे हे देखील नेमकी काय भूमिका घेतात याकडेही लक्ष आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी सुधामती विठ्ठल कवाद व चित्रा सचिन वराळ यांच्यात सरळ लढत होण्याची शक्यता आहे.
सरपंचपदाच्या निवडीमध्ये माजी सरपंच ठकाराम लंके, चंद्रकांत लामखडे, सचिन वराळ, वसंतराव कवाद, प्रभाकरराव कवाद, रंगनाथ वराळ, बबुशाअण्णा वरखडे, ज्ञानदेव लंके, खंडू भुकन, बबनराव कवाद, उमेश सोनवणे, सोमनाथ वरखडे, रमेश वरखडे, शिवाजी गुंड, अनिल शेटे, विठ्ठल कवाद, सुनील वराळ, बाळासाहेब लामखडे आदींची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.
--
उपरसंपचपदासाठी भरत रसाळ, शंकर गुंड यांची नावे
उपसरपंचपदासाठी भरत रसाळ, शंकर गुंड, माउली वरखडे यांचीही नावे चर्चेत आहेत. तसेच काही नवे समीकरण तयार झाल्यास ऐनवेळी नवी नावे पुढे येऊ शकतात.
फोटो : ०१ सुधामती कवाद, ०१ चित्रा वराळ