अळकुटी : पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील साईनाथ विद्यालयात बारावी परीक्षा केंद्रावर शिक्षकच मुलांना कॉपी पुरवित असल्याचे स्टिंग आॅपरेशन विद्यार्थ्यांनी केले आहे़ हे व्हिडीओ चित्रीकरण चव्हाट्यावर आल्यानंतर आता रयत शिक्षण संस्था व पुणे विभागीय परीक्षा मंडळ या प्रकरणाची चौकशी करणार आहे. यामुळे केंद्र प्रमुख संपत काळे यांच्यासह पाच शिक्षक अडचणीत येण्याची शक्यता आहे.अळकुटी येथील साईनाथ विद्यालयात बारावी परीक्षेत काही शिक्षकांची मुले परीक्षा देत होते़ एक ते दोन शिक्षक परीक्षेदरम्यान केंद्रावर थांबून प्रश्नपत्रिका वेळेपूर्वीच फोडतात व स्वत:च्या मुलांना कॉप्या पुरवतात,असा आक्षेप घेऊन ‘मनसे’चे सुमित वर्मा, अशपाक हवालदार, प्रवीण आढाव, सुमीत फुलारी, जालिंदर बांडे, सागर जाधव यांनी भौतिकशास्त्राच्या पेपरला आंदोलन केले़ याप्रकरणी केंद्रसंचालक संपत काळे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात या सर्वांविरुध्द फिर्याद दिली होती. या प्रकरणानंतर विद्यार्थ्यांना हाताशी धरून मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष अशपाक हवालदार, जालिंदर बांडे आदींनी अळकुटी केंद्रावर शिक्षक स्वत:च्या विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवित असल्याचे चित्रीकरण केले़ यात केंद्रसंचालक संपत काळे यांच्यासह पाच शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी रयत शिक्षण संस्थेचे निरीक्षक भाऊसाहेब शिरसाठ, पुणे विभागीय परीक्षा मंडळाचे विभागीय सचिव पुष्पलता पवार यांच्याकडे केली आहे. त्यानुसार पुणे विभागीय परीक्षा मंडळाने चौकशी सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांनी केले कॉप्यांचे स्टिंग
By admin | Updated: March 10, 2016 00:02 IST