लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोनामुळे शाळा बंद असल्याने शासनाने ॲानलाइन अभ्यासक्रम सुरू केला. मात्र, याचे दुष्परिणाम आता विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत आहेत. अनेक विद्यार्थी यामुळे स्क्रीन ॲडिक्ट झाले आहेत.
कोरोनामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासद्वारे शिक्षण देण्यास सुरुवात झाली. मोबाइल, काॅम्प्युटरवर विद्यार्थी अध्ययन करत आहेत. वर्षाचा सिलॅबस शिकवताना विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम वाढत गेला. एकाच वेळी पाच ते सहा तास विद्यार्थी स्क्रीनपुढे बसत असल्याने डोळ्यांचे आजार वाढले आहेत.
बालरोगतज्ज्ञांच्या मते स्क्रीन टाइम वाढल्याने डोळ्यांबरोबरच इतर शारीरिक आजारही वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालकांनी मोबाइल किंवा जास्त स्क्रीन वापराचे दुष्परिणाम ओळखून सजग व्हावे, असे तज्ज्ञांचे मत आहे. नगर जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंत ९ लाख ६ हजार ३३ विद्यार्थी असून, यातील ५५ ते ६० टक्के विद्यार्थी अजूनही ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.
----------
...अशी घ्या काळजी
२०-२०-२० रूल
मुलांनी स्क्रीन हाताळताना प्रत्येक २० मिनिटांनंतर २० सेकंदांचा ब्रेक घ्यावा, तसेच आपण बसलो तेथून २० फुटांवरील कोणत्याही वस्तूकडे पाहावे. असा हा २०-२०-२० नियम पाळल्यास डोळ्यांना आराम मिळतो. याशिवाय २ वर्षांपर्यंत मुलांना मोबाइलचा स्क्रीन दाखवू नये. २ ते ५ वर्षांपर्यंतच्या मुलांनी रोज एक तास, तर ६ वर्षांपुढील मुलांनी २ तासापेक्षा जास्त स्क्रीन पाहू नये, असे तज्ज्ञांचे मत आहे.
---------
...हे आहेत दुष्परिणाम
वाढत्या स्क्रीन टाइममुळे मुलांना डोळ्यांचे आजार जडतात.
चिडचिडेपणा वाढतो, डोळ्यात जळजळ, तसेच झोपेवरही परिणाम होतो.
लक्ष्य केंद्रित करण्यास मुलांना अवघड जाते.
भाषेवरही विपरीत परिणाम संभवतो.
स्थूलता, स्वकेंद्रितपणा, असे प्रकारही पुढे येतात.
------------
पालकांनी २ वर्षांपर्यंतच्या मुलांना अजिबात मोबाइलचा स्क्रीन दाखवू नये. अभ्यासासाठी जरी स्क्रीन वापरला जात असला तरी त्याचे वेळापत्रक ठरवून घ्यावे. दिवसभरात ३ तासांपेक्षा जास्त मोबाइल वापरू नये. पालकांनी सतत मुलांसमोर मोबाइल न हाताळता काही काळ सर्वच कुटुंब सदस्यांनी मोबाइलला फाटा देऊन संवाद साधावा. काॅम्प्युटरचा स्क्रीन तीन फूट, तर मोबाइलचा स्क्रीन दीड फूट अंतरावरूनच पाहावा.
-डाॅ. सूचित तांबोळी, बालरोगतज्ज्ञ
---------------
वर्गनिहाय पटसंख्या-----------