अहमदनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या येथील उपकेंद्राला मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे़ उपकेंद्राचा तेरा कोटी आठ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून, कामास गती प्राप्त झाल्याची माहिती विद्यापीठ अधिसभेचे सदस्य राजेंद्र विखे यांनी दिली़ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सुविधा जिल्ह्यातच निर्माण व्हावी यासाठी पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र नगर येथे व्हावे यासाठी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी खासदार यशवंतराव गडाख, दादापाटील शेळके, आमदार चंद्रशेखर घुले आदींनी मोलाचे योगदान दिले. बाबुर्डी घुमट येथे जागा मिळविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांच्यासह बाबुर्डी घुमट ग्रामपंचायतीचे आणि ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभले. आता मंत्रिमंडळाने या उपकेंद्राच्या आराखड्याला मंजुरी दिल्याने मुख्य प्रशासकीय इमारतीसह, कला, वाणिज्य, औषधनिर्माण, व्यवस्थापन, शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान या विभागांबरोबरच मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, माहिती केंद्र, सुसज्ज ग्रंथालय, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवास व्यवस्था, क्रीडा संकुल, जलतरण तलाव, अतिथीगृहासह अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत, लाईटची व्यवस्था आदी पायाभूत सुविधांच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे विखे म्हणाले.नगरला उपकेंद्र मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकर पिचड, कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, डॉ. व्ही. बी. गायकवाड यांचे राजेंद्र विखे यांनी आभार मानले. या उपकेंद्रात आता उपकुलगुरू, कुलसचिव, उपकुलसचिव आदी पदांबरोबरच ९० शिक्षक, १७९ शिक्षकेत्तर अशी २६९ पदे निर्माण करण्यात येणार आहेत, असेही राजेंद्र विखे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
विद्यापीठ उपकेंद्राच्या कामाला गती
By admin | Updated: August 17, 2014 23:33 IST