स्टार ८९५
श्रीरामपूर : तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच माणसाचे त्यावरील अवलंबित्व वाढत चालले आहे. एक प्रकारे तो परावलंबी झाला आहे. स्मरणशक्तीवर त्याचा विपरित परिणाम होत आहे. ‘लोकमत’ने त्यावर रिॲलिटी चेक केला. त्यासाठी काही लोकांशी थेट संपर्क साधला, तर अनेकांना आपल्या पत्नीचा मोबाइल नंबर पाठ नसल्याचे दिसून आले. काही पत्नींना याबाबत विचारले असता, त्यांनाही पतिदेवाचा नंबर पाठ नसल्याचे लक्षात आले. मुलांना मात्र आपल्या आई-वडिलांचे नंबर तोंडपाठ आहेत.
मोबाइलच्या अति वापरामुळे लोक आपल्या रिकॉल मेमरीचा वापर करत नाहीत. त्यामुळे असे प्रकार घडत आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाने माणूस हायटेक झाला आहे. मात्र, तो पूर्णपणे तंत्रज्ञानावर परावलंबी झाला. केवळ मोबाइल बंद पडला, तर त्याची सर्व कामे ठप्प होतात. यावर उपाय म्हणजे प्रत्येक नागरिकाने आपल्या रिकॉल मेमरीचा वापर केला पाहिजे, अन्यथा मेमरी असतानाही त्याचा उपयोग होणार नाही.
शहरातील तरुण, ज्येष्ठ यांना त्यांच्याच मित्रपरिवाराचे वाढदिवस, तसेच मोबाइल क्रमांक पाठ नाहीत, असे दिसून आले. सोशल मीडियावर वाढदिवसाची माहिती कळल्यानंतरच शुभेच्छा, अभिनंदनाचे फोन कॉल्स सुरू होतात, तोपर्यंत अगदी घरातील जवळची माणसेही वाढदिवसाबाबत अनभिज्ञ असतात, अशी माहिती काहींनी दिली.
तरुणांना आई-वडिलांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही नातेवाइकांचे मोबाइल नंबर पाठ नाहीत. वृद्धांनी मात्र जुन्या डायरी जपून ठेवल्या आहेत. त्यात घरात आवश्यकता पडणाऱ्या प्लंबर, वायरमन, मॅकेनिक, डॉक्टर, रिक्षावाले आदींचे नंबर व्यवस्थितपणे लिहून ठेवल्याचे आढळले.
---------
बायकोचा नंबर पाठ नाही
दहापैकी सहा जणांना बायकोचा नंबर पाठ नाही, असे रिॲलिटी चेकमध्ये आढळले. मात्र, आपले नाव गुप्त ठेवावे, अशी अटही त्यांनी घातली. मुलांनी मात्र, आई-वडिलांची नावे चटकन सांगितले. मेंदूला काहीसा ताण देऊन बायकोचा नंबर आता पाठ करून घेऊ, असेही काही पतिदेव म्हणाले.
-------
लहान मुलांकडून आपण वारंवार एखादी गोष्ट पाठ करून घेतो. ज्येष्ठांच्या बाबतीत मात्र तसे घडत नाही. ते तंत्रज्ञानावर परावलंबी झाल्याने शॉर्ट मेमरीचा ते वापर करत नाहीत.
-डॉ.संतोष गायकवाड, मानसशास्त्र विभागप्रमुख, बोरावके महाविद्यालय.
--------