अहमदनगर: गाव मतदारसंघात नसल्याचा समज करून बुरूडगावचे पाणी तोडण्याचे काम महापालिकेने सेनेच्या सत्तेच्या काळातच केले. नंतर गाव शहर विधानसभा मतदारसंघात असल्याचे समजले. त्यानंतर मतदान मिळविण्यासाठी सेनेला आंदोलनाची उपरती झाली आहे. आता बुरूडगावकरांच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा कळवळा विद्यमान आमदार अनिल राठोड दाखवत असल्याचे समोर आले आहे. १९९९ साली हद्दवाढीत बुरूडगावचा समावेश नगर शहरात करण्यात आला. २००३ साली महापालिका झाल्यानंतर भगवान फुलसौंदर, नितीन जगताप, कांताबाई शिंदे यांनी या भागाचे प्रतिनिधीत्व केले. २००४ पासून मुळा धरणाचे पाणी या गावास पिण्यासाठी मिळू लागले. महापौर पद या भागाला मिळाले असतानाही गावचा विकास मात्र झाला नाही. जून २०११ मध्ये महापालिका हद्दीतून हे गाव वगळण्यात आले. गाव हद्दीबाहेर जाताच महापालिकेने या गावचा पाणी पुरवठा तोडला. गावाचा पाणी पुरवठा बंद करण्याचा ठराव महासभेत घेण्यात आला. त्यावेळी महापौर होत्या सेनेच्या शीला शिंदे. गाव हद्दीबाहेर गेल्याने ते पारनेर अथवा श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात गेल्याचा समज सेनेचे विद्यमान आमदार अनिल राठोड यांना झाला. पाणी तोडल्याने गत तीन वर्षापासून या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. विधानसभा निवडणुकीचे नगारे आता वाजण्यास सुरूवात झाली आहे. मतदारसंघात बुरूडगाव असल्याचे समोर येताच आमदार अनिल राठोड व त्यांच्या समर्थकांना बुरूडगावच्या मदतीला धावले आहेत. या गावाला महापालिकेने पाणी पुरवठा केला पाहिजे यासाठी राठोड यांनी आयुक्तांच्याकडे धोशा लावला आहे. माणुसकीच्या भावनेतून गावाला पाणी देण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र मीटरपध्दतीने पाणी द्यावे, पाणीपट्टी वसुलीसाठी गावातीलच काही नागरिकांची समिती नियुक्त करण्याचा उल्लेख सेनेच्या काळातील ठरावात आहे. पण हा ठराव निव्वळ कागदावरच राहिला. सेनेची सत्ता असताना गावचे पाणी महापालिकेने तोडले. तत्कालीन महापौर शीला शिंदे यांनी नेत्याच्या सांगण्यानुसार ठराव केल्याचे सांगितले होते. गाव मतदारसंघात नसल्याचा समज झाल्याने राठोड यांनीच पाणी तोडण्याचा ठराव घेण्याचे सांगितले. आता गाव मतदारसंघात आल्याचे समजल्यानंतर त्यांचे आंदोलन सुरू आहे.- बापू कुलट, माजी सरपंच
शिवसेनेने तोडले पाणी
By admin | Updated: August 8, 2014 00:07 IST