शिर्डी : पास काढूनही शिर्डी बसस्थानकात विद्यार्थ्यांना एसटी बसमध्ये घेतले जात नाही़ वारंवार तक्रार करुनही त्रास सुरूच राहिल्याने विद्यार्थ्यांनी बुधवारी आंदोलनाचे हत्यार उपसले़ काही विद्यार्थ्यांनी बसवर चढून, तर काहींनी समोर बसून बस रोखल्याने एकच गोंधळ उडाला़गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे़ चार दिवसांपूर्वी निवेदन दिले होते तर दोन दिवसांपूर्वीही झालेल्या आंदोलनानंतर बसेस मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे आश्वासन बस स्थानक प्रमुखांनी दिले होते़ मात्र दोनच दिवसांनी स्थिती पूर्ववत झाल्याने विद्यार्थ्यांनी चक्क बसवर चढून आंदोलन केले़ या घटनेचे वृत्त समजताच शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अभय शेळके, भाजपाचे शहर प्रमुख राजेंद्र गोंदकर, शिवसेनेचे सचिन कोते आदींनी आंदोलकांना पाठिंबा दिला़ आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संपत भोसले, सहाय्यक निरीक्षक अरविंद भोळे घटनास्थळी पोहोचले़ त्यानंतर कोपरगावहून आलेले आगार व्यवस्थापक बेलदार यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार चार जादा बसे सोडण्याचे व ठराविक ठिकाणी बसला थांबे देण्याचे लेखी मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़ बसमध्ये न घेतल्याने वेळेवर परीक्षेला न पोहचू शकल्याने आजवर अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे़ (तालुका प्रतिनिधी)
शिर्डीत विद्यार्थ्यांचे आंदोलन
By admin | Updated: September 3, 2014 23:59 IST