शेवगाव : मान्सून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना धोकादायक इमारती आणि वाड्यांचे नगर परिषदेच्या संबंधित विभागाकडून अद्यापही स्ट्रक्चरल ऑडिट झाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ओढे-नाले, शहरातील गटारींची साफसफाई, रस्त्यावरील खड्डे बुजविणे, ओढ्यालगतचे अतिक्रमण हटविणे आदी पावसाळ्यांपूर्वीच्या कामांचा विसर नगर परिषद प्रशासनाला पडला आहे.
शहरातील जवळपास २५ धोकादायक इमारती आणि वाड्यांची नोंद, पूर्वी झालेल्या सर्वेक्षणानुसार नगर परिषदेच्या दप्तरी करण्यात आलेली आहे. दरवर्षी नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट न करता त्यांनाच नोटिसा पाठवून नगर परिषद प्रशासन सोपस्कार पार पाडते. पावसाळ्यात इमारत, वाडे कोसळून दुर्घटनेतून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून दरवर्षी संबंधित मालमत्ताधारकांना नोटीस पाठवून मालमत्तेची डागडुजी करावी, अथवा मालमत्ता अतिधोकादायक अवस्थेत असल्यास तेथील रहिवाशांना स्थलांतरित होण्यासंदर्भात नोटिसा बजावण्यात येतात; मात्र यंदा त्याही नोटिसा अद्याप पाठविल्या नसल्याची माहिती समोर आली आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेवगाव नगर परिषदने शहरातील नित्यसेवा रोडवरील सूर्यकांता व सोनमियाँजवळील नंदी ओढ्याची तसेच गावातील गटारींची स्वच्छतेची व साफसफाईची मोहीम अद्याप हाती घेतली नाही. क्रांती चौक ते आंबेडकर चौक दरम्यान असलेल्या जुन्या प्रेसजवळ व पंचायत समितीच्या समोरील रस्त्यावर पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यामुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होऊन वाहनांना व पादचाऱ्यांना पाण्यातून मार्ग शोधणे कठीण जाते. दरवर्षी पावसाळ्यात याठिकाणी साचणाऱ्या पाण्याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागतो आहे. सदर पाण्याचा निचरा करण्यास नगर परिषद दरवर्षी अपयशी ठरते आहे.
.........
स्ट्रक्चरल ऑडिट कसे होते..
नगर परिषद हद्दीत ३० वर्षांपेक्षा अधिक इमारती आणि वाडे असल्यास त्यांना स्ट्रक्टरल ऑडिट करणे बंधनकारक असते. या इमारतींचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट होऊन अतिधोकादायक वाडे आणि इमारतींमधील रहिवाशांना तातडीने स्थलांतरित होण्याचे आदेश दिले जातात.
.........
धोकादायक इमारतींविषयीची माहिती आरोग्य विभागाकडे आहे. किती लोकांना नोटिसा पाठविल्या, याबाबत मला माहिती नाही. आरोग्य विभागाची यंत्रणा ते काम करते.
-एजाज पठाण,
नगररचनाकार, शेवगाव.
........
धोकादायक इमारती व वाडे याबाबतची माहिती घेऊन कळवितो.
-अंबादास गर्कळ,
प्रभारी मुख्याधिकारी, शेवगाव