कोपरगाव : कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीचा कमी प्रमाणात पुरवठा होत आहे. त्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या शेकडो ज्येष्ठ नागिरकांना आल्यापावली परत जावे लागत असल्याने त्यांची हेळसांड होत आहे. त्यामुळे शासनाने जास्त प्रमाणात पुरवठा करावा, अशी मागणी या नागरिकांमधून होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, वेगवेगळ्या वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्यात येत आहे. सद्या सर्वत्र ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लसीची मागणी वाढली आहे. याच दरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या दुसऱ्या डोसचा टप्पा सुरू आहे.
मात्र, यासाठी कोपरगाव शहरात फक्त २०० डोस येतात आणि प्रत्यक्षात ५०० ज्येष्ठ नागरिक हे लस टोचून घेण्यासाठी रांगेत उभे असतात, परंतु २०० डोस हे चुटकीसरशी संपून जातात आणि उर्वरित नागिरकांना आल्या पावली परत जावे लागत आहे. दुसऱ्या दिवशीही अशीच परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे आठवडाभर येरझऱ्या मारूनही लस मिळत नसल्याने, आता मात्र ही मडळी हतबल झाली आहे. काहींना तर अक्षरश: दुखणे आले आहे. या सर्व प्रकारांत आरोग्य कर्मचाऱ्यांनाही मर्यादा येत आहे. प्रसंगी ज्येष्ठ नागरिक लस मिळत नसल्याच्या तणावात कर्मचाऱ्यांवर चिडचिड करीत आहेत.
.............
कोपरगावात लसीचा कमी प्रमाणात पुरवठा होत असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहे. लसीकरणाच्या दिवशी शेकडो ज्येष्ठ नागरिक लसीचा दुसरा डोस मिळेल, या आशेने धावपळ करून केंद्रावर जात आहेत. मात्र, लस न घेताच आल्यापावली परत जावे लागत आहे.
- जनार्दन कदम, नगरसेवक, कोपरगाव
.........
ज्येष्ठ नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी दोन्ही लसींचे प्रत्येकी १३० डोस येतात, तर ५०० पेक्षा जास्त नागरिक लस घेण्यासाठी येत आहेत. प्रसंगी लस मिळाली नाही, म्हणून कर्मचाऱ्यावर चिडचिड करीत आहे, परंतु लसच नसल्याने नाईलाज होत आहे.
- डॉ.कृष्णा फुलसौदर, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, कोपरगाव
........