संगमनेर : शिक्षण विभागाच्या २१ कलमी कार्यक्रमांतर्गत घुलेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने क्षेत्रभेट दाखवून सकाळी ११ वाजताच शाळा सोडून देणाऱ्या शिक्षकांना निलंबित करण्याची मागणी पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते सरूनाथ उंबरकर यांनी आहे. शुक्रवारी उंबरकर हे पंचायत समितीचे विषयतज्ञ रणदिवे यांना सोबत घेवून घुलेवाडी शाळेवर गेले असता कुलूप असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.२१ कलमी कार्यक्रमांतर्गत १ जुलै रोजी कृषी दिनी क्षेत्रभेटीचा कार्यक्रम ठरवून दिलेला आहे. तर १८ जुलैला ‘इंग्लिश डे’ व परिपाठात अण्णाभाऊ साठेंच्या जीवनकार्याची माहिती द्यावी, असे शैक्षणिक नियोजनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. परंतु शाळेने आजच्या नियोजनात फलकावर क्षेत्रभेट (राजहंस दूध संघ) दाखवून वेळेआधीच शाळा सोडून दिली. शाळेच्या टाकीवर पाणी भरण्यासाठी आलेल्या इयत्ता चौथीमधील एका विद्यार्थीनीस उंबरकर यांनी विचारले असता आम्हाला सकाळी ७-८ वाजता बोलवून दूध संघात नेले. तेथून आल्यावर पोषण आहार देवून शाळा सोडून दिल्याचे तिने सांगताच उंबरकर अवाक् झाले. शेजारच्या अंगणवाडीत विचारणा केल्यावर सेविकेने देखील तेच उत्तर दिले. त्यामुळे उंबरकर यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, गटविकास अधिकारी भूपेंद्र बेंडसे व गटशिक्षणाधिकारी वसंत जोंधळे यांच्याशी संपर्क साधून तक्रार केली. (प्रतिनिधी)काय आहे २१ कलमी कार्यक्रम?शैक्षणिक वर्ष २०१४-१५साठी शैक्षणिक नियोजन करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, शिक्षण हक्क कायदा २००९नुसार शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे, काही समान व काही किमान २१ कलमी उपक्रमांची सर्व शाळांमधून प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे. चौकरी करून कारवाई करूशिक्षण विभागाने राबविलेल्या २१ कलमी कार्यक्रमाच्या आदेशाचे उल्लंघन झाले आहे. क्षेत्र भेटीची तारीख नसताना शाळा सोडून देवून शिक्षकांनी सामुहिक दांडी मारली. सदर कार्यक्रमाचा गैरफायदा घेणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांना तत्काळ निलंबीत करावे. - सरूनाथ उंबरकर, विरोधी पक्षनेतेघुलेवाडी शाळेला सरूनाथ उंबरकर यांनी भेट दिली असता शिक्षक व विद्यार्थी आढळून आले नाही. त्यावेळी शाळा बंद होती, हे त्यांचे म्हणणे खरे आहे. शिक्षक क्षेत्र भेटीला गेल्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कळविले. क्षेत्र भेटीचा वार नव्हता. शाळा सोडण्याची परवानगी घेतलेली नव्हती. याची चौकशी करून कारवाई करू. - भूपेंद्र बेंडसे, गटविकास अधिकारी
क्षेत्र भेटीच्या नावाखाली शाळेला दिली सुट्टी
By admin | Updated: July 22, 2014 00:06 IST