श्रीरामपूर : कोरोनामुळे शाळा बंद करण्यात आल्या. परिणामी स्कूल बसमधील वाहतूकही बंद झाली. त्यामुळे बसचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. स्कूल बसमधून इतर कोणत्याही प्रकारची वाहतूक करता येत नाही. त्यामुळे या बसेस एका जागेवर उभ्या आहेत. नाईलाजाने काही चालकांनी या बसेसमधून भाजीपाला, तसेच प्रवासी भाडे वाहतूक सुरू केली आहे.
दरम्यान, अनेक उच्च शिक्षित तरुणांनी बँकांचे कर्ज घेऊन या स्कूल बसेस खरेदी केल्या. त्यातून एक हक्काचा रोजगार उपलब्ध होईल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर आर्थिकदृष्ट्या डबघाईस जाण्याची वेळ आली आहे. बँकांचे हप्ते थकल्याने त्यांच्याकडून वसुलीसाठी तगादा सुरू झाला आहे. कुटुंबाचा खर्च भागवायचा की बँकांचे हप्ते फेडायचे असा पेच उभा राहिला आहे.
स्कूल बसेसवर चालकाबरोबरच मेकॅनिक, ऑटोमोबाईल असा व्यवसाय अवलंबून आहे. तो व्यवसायही त्यामुळे अडचणीत सापडला आहे. कुठे बसचे टायर पंक्चर झालेले तर कुठे बॅटरी उतरलेली, सीटवर धूळ साचलेली तर कुठे गंज चढलेला अशी स्थिती झालेली आहे.
---------
राज्य सरकारने रिक्षा चालक व शेतकऱ्यांकडे लक्ष दिले. मात्र स्कूल बसचालकांचा कोणताही विचार केलेला नाही. आम्हाला कुटुंब चालविण्याकरिता काही आर्थिक मदत करावी.
-सागर खळेकर.
-------------
सरकारने बसचालकांना प्रवासी वाहतुकीकरिता परवानगी द्यावी. त्याचबरोबर दोन वर्षांचा आरटीओ टॅक्सही माफ करावा. अन्यथा आत्महत्येचे सत्र सुरू होण्याची भीती आहे.
-शोएब शेख.
--------
जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या
जिल्ह्यात पहिली ते दहावीपर्यंत सात लाख ७९ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील लाखो विद्यार्थी स्कूल बसने वाहतूक करत आहेत.
--------