श्रीगोंदा : पूर्वाश्रमीचा श्रीगोंदा आणि आताचा नागवडे सहकारी साखर कारखान्याचा पहिला गाळप हंगाम सन १९७२ ला सुरू झाला. स्व. शिवाजीराव नागवडे यांनी पारदर्शक कारभाराच्या माध्यमातून सत्तेचा लगाम कायम ठेवला. मात्र, कारखान्याच्या इतिहासात अपवाद वगळता सर्वच उपाध्यक्षांनी राजीनामा देत बंडाचा राजकीय सारीपाट मांडला आहे.
सन १९८४ नंतर कारखाना अध्यक्षांवर नेहमीच उपाध्यक्षांनी भ्रष्टाचाराचे आरोप करीत राजकीय भूकंप करण्याचे सत्र सुरू झाले. सन १९८४ ला आ. बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा साखर कारखान्यात सत्तांतर केले. बबनराव पाचपुते हे कारखान्याचे अध्यक्ष झाले. प्रा. तुकाराम दरेकर यांना उपाध्यक्ष केले. पाचपुते-दरेकर यांच्यात अवघ्या दोन वर्षांत बिनसले. दरेकर यांनी पाचपुते यांच्या विरोधात बंड केले. त्यानंतर जिजाबापू शिंदे यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली. शिंदेंनीही पाचपुतेंना सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर शिवाजीराव नागवडे यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे आली. भगवानराव पाचपुते, ज्ञानदेव हिरवे, सुभाष शिंदे यांना उपाध्यक्ष केले. पाचपुते, हिरवे यांनीही नागवडेंच्या विरोधात बंड केले.
शिवाजीराव नागवडे यांनी निष्ठावंत असलेले केशव मगर यांना उपाध्यक्ष केले. शिवाजीराव नागवडे यांचे निधन झाले. कारखान्याचे अध्यक्षपद राजेंद्र नागवडे यांच्याकडे आले. त्यांच्याविरोधात उपाध्यक्ष केशव मगर यांनी नुकतेच बंड केले आहे. त्यामुळे श्रीगोंद्याच्या आखाड्यात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
केशव मगर हे नागवडेंच्या गळ्यातील ताईत होते. मगर यांनी नेहमीच नागवडेंची पाठराखण केली. कारखाना निवडणुकीच्या तोंडावर मगर यांनी राजीनामा दिल्यामुळे निवडणुकीचे वातावरण तापणार आहे.