चाकूचा धाक दाखवून साईभक्तास लुटले
By admin | Updated: April 11, 2017 17:31 IST
साईदर्शनासाठी आलेल्या पुणे येथील साईभक्तास रविवारी मध्यरात्री अज्ञात पाच जणांनी चाकूचा धाक दाखवून लुटले.
चाकूचा धाक दाखवून साईभक्तास लुटले
शिर्डी : साईदर्शनासाठी आलेल्या पुणे येथील साईभक्तास रविवारी मध्यरात्री अज्ञात पाच जणांनी चाकूचा धाक दाखवून लुटले. त्याचा मोबाईल व रोख रक्कम लंपास केली़ शिर्डी पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता पोलिसांनी याबाबत कोणतीही गंभीरता दाखवली नसल्याचे तक्रारदार माधव गणपतराव कपाटे यांनी सांगितले.ते म्हणाले की, साईबाबांच्या दर्शनसाठी शिर्डीत आलो होतो. द्वारावती भक्त निवासच्या पार्किंगमध्ये गाडी (क्रमांक एम.एच. २६ एके- ६८९७) मध्ये झोपलो असता रात्री १२-४५ वाजेच्या सुमारास पाच जण आले. त्यांनी गाडीची काच उघडून चाकू लावला. १४ हजार रुपयांचा मोबाईल व रोख रक्कम घेऊन जात असता बचाव करण्यासाठी आरडा ओरड केली़ त्यावेळी शेजारील गाडीत ( क्रमांक एम.एच. १२ एनएक्स- ५६७६)झोपलेले अनिल पांडुरंग भारती यांना जाग आली. ते उठले असता त्यांच्या गाडीवरही या चोरटयांनी लाकडी दांडा मारुन दरवाजा बंद केला. याबाबत रात्रीच शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दोन पोलीस घटनास्थळी आले त्यांनी केवळ पाहणी केली व कोणताही कारवाई न करता निघून गेले. पुन्हा पोलीस ठाण्यात गेलो असता पोलीस झोपलेले होते. चोरीची तक्रार नोंदवून घेतली नाही, असे या भक्तांनी म्हटले आहे. साईबाबा संस्थानच्या द्वारावती निवासच्या पार्किंगमध्ये चाकू तसेच काठ्यांचा धाक दाखवून भक्तांना लुटल्याचा घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. शिर्डी पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालून या लुटारुंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी साईभक्तांनी केली आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी हैदराबाद येथील साईभक्त खाजगी आराम गाडीने पहाटेच्या सुमारास शिर्डीत आले होते. सीतानगर येथे गाडीतून उतरत असताना स्विप्ट डिझायर कारमधून आलेल्या चार जणांनी काठ्या व चाकूचा धाक दाखवून या भक्तांचा २१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता़(शहर प्रतिनिधी)