राहुरी : मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर सोमवारी पावसाने धुवाँधार हजेरी लावली़ धरणाच्या ११ मोऱ्यातुन ९ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे़ लाभ क्षेत्रावरही पावसाने जोर धरला आहे़२६ हजार दलघफु पाणी साठवण क्षमता असलेले मुळा धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे़ धरणाच्या ४४ वर्षाच्या इतिहासात २६ वेळेस ओव्हर फ्लो झाले आहे़ धरणात २५ हजार ९७५ दशलक्ष घनफुट पाणी साठ्याची नोंद झाली आहे़कोतुळ येथे १० मिलीमिटर पावसाची नोंद झाली़ पारनेर तालुक्यतही पाऊस झाल्याने पाणी धरणाकडे वाहून येत आहे़ पाणलोट क्षेत्रावर सकाळी ढगाळ वातावरण होते़ त्यामुळे सुर्यदर्शन झाले नाही़ दुपारी दमदार पावसाला सुरूवात झाली़ प्रत्येक तासाला मुळा धरणाची पातळी तपासली जात असल्याची माहीती आऱ के़ पवार यांनी दिली़लाभक्षेत्रावरही पावसाने जोरदार सलामी दिली़ राहुरी येथे तब्बल ९० मिलीमिटर पावसाची नोंद झाली़ मुळानगर येथे ९७ मि़मी़ तर वांबोरी येथे ६० मि़मी़ पावसाची नोंद झाली़ सायंकाळपर्यंत पाऊस सुरू होता़पावसाचे प्रमाण लक्षात घेता धरणाचा सध्य साठा कायम ठेऊन अतिरिक्त येणारे पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे़मुळा नदी दुथडी भरून वहात असली तरी विहीरींच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ झालेली नाही़ आणखी चार दिवस पाऊस हजेरी लावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे़ मुळा नदी पात्रातून १५ ते २० दिवस पाण्याचा प्रवाह सुरू रहाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे़(तालुका प्रतिनिधी)
मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली
By admin | Updated: October 4, 2016 00:42 IST