यावेळी अंनिसच्या राज्य कार्यवाहक ॲड. रंजना गवांदे, ज्येष्ठ नेते कॉ. बाबा आरगडे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद भारुळे, शहर सचिव विनायक सापा, कारभारी गायकवाड, भारतभूषण भागवत, सोन्याबापू मुसळे, ॲड. प्राची गवांदे आदी उपस्थित हाेते.
पाटील म्हणाले, मोहटादेवी देवस्थान ट्रस्टच्या तत्कालीन विश्वस्त मंडळाने केलेल्या ठरावानुसार धार्मिक विधी करून मंदिरात सोने पुरले. हा अशास्त्रीय आणि अंधश्रद्धेतून घेतलेला निर्णय होता. या कृत्यामध्ये ट्रस्टचे अध्यक्ष तथा तत्कालीन जिल्हा न्यायाधीश यांचाही सहभाग होता. याबाबत माध्यमांनी आवाज उठविला. या गैरकृत्याबाबत पोलीस, धर्मादाय विभाग यांच्याकडे तक्रारी झाल्या होत्या मात्र याची कुणीच दखल घेतली नाही. अखेर माजी विश्वस्त नामदेव गरड यांनी औरंगाबाद खंडपीठात या गैरकृत्याबाबत याचिका दाखल केली. यात अंनिसनेही सहभागी होत दोषींवर कारवाई करण्याची मागणी न्यायालयात केली होती. याचिकेचे अवलोकन करत न्यायालयाने सर्व दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार अंनिसतर्फे ॲड. रंजना गवांदे या पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद देणार आहेत.
.....................................
देवस्थानचे पैसे जनतेसाठी वापरावे
धार्मिक संस्था या सार्वजनिक आहेत. सध्या या संस्था मात्र सत्ताकेंद्रित झालेल्या आहेत तसेच या संस्थांवर प्रशासनातील अधिकारी पदांवर आहेत. राजसत्ता आणि धर्मसंस्था यांची सांगड हे भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता या मूल्याशी विसंगत आहे. या संस्थांमधील पैसे सर्वसामान्यांच्या हितासाठी वापरले जावेत. यासाठी अंनिस पाठपुरावा करणार आहे. मोहटा देवस्थानमध्ये झालेल्या गैरकृत्याबाबत विधिमंडळातही चर्चा झाली होती. यावेळी मात्र धोरणात्मक काहीच निर्णय झाला नाही. सात वर्षांच्या संघर्षानंतर या प्रकरणात आता कारवाई होत आहे, असे अविनाश पाटील यांनी सांगितले.