नाशिक: दिसण्यापेक्षा असण्यावर भर देणारी, सामान्य ज्ञानापासून तर कलाविष्काराच्या कसोटीतून पात्र ठरविणारी, आत्मविश्वासातून सम्राज्ञीपर्यंतचा प्रवास लीलया घडविणारी सखी सम्राज्ञी २०१४ ची महाअंतिम फेरी म्हणजे कलागुणांची चौफेर उधळण करणारा नेत्रदीपक सोहळा होता. लोकमत सखी मंच व सोनी पैठणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय ‘सखी सम्राज्ञी’ या व्यक्तिमत्त्व स्पर्धेचा दिमाखदार महाअंतिम सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. जळगावच्या रिनी शर्मा या ‘सखी सम्राज्ञी २०१४’ किताबाच्या मानकरी ठरल्या. लोकमत सखी मंचच्या गोवासहित महाराष्ट्रात १३ विभागात प्राथमिक फेरी, अंतिम फेरी आणि राज्यस्तरीय अंतिम फेरी अशाप्रकारे ही स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक ठिकाणी जिंकलेल्या १३ सखीसम्राज्ञींची दिनांक २५ व २६ आॅगस्ट रोजी नाशिक येथे महाअंतिम फेरी घेण्यात आली. केवळ बाह्य सौंदर्यावर भर न देता बौद्धिक क्षमतेची उंची लक्षात घेऊन सहा फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. या २५ तारखेला सामान्य ज्ञान फेरी आणि वक्तृत्व स्पर्धा (समयस्फूर्त फेरी) घेण्यात आली. दिलेल्या विषयावर वेळेवर बोलायचे होते. अगदी आधुनिक युगापासून तर पौराणिक विषयांचा समावेश या स्पर्धेत होता आणि दि. २६ तारखेला रंगमंचावरचा चार फेऱ्यांचा दिमाखदार सोहळा नाशिककरांसाठी आनंदाची पर्वणी ठरला. या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा नाशिकच्या कालिदास कलामंदिर येथे पार पडला. या कार्यक्रमास अभिनेत्री सुधा चंद्रन, अभिनेते रवींद्र मंकणी, गायक अभिजित कोसंबी यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून गोविंद दंडे अॅण्ड सन्सचे संचालक धनंजय दंडे, सौ. मीना दंडे, सोनी पैठणीचे संचालक संजय सोनी, सौ. सोनी, श्रीवास्तव सोनी, हॉटेल रॉयल हेरिटेजच्या सौ. मुग्धा शाह, समुपदेशक सुषमा करंदीकर उपस्थित होते. या कार्यक्रमाला गोविंद दंडे अॅण्ड सन्स यांचे सहप्रायोजकत्व लाभले. प्रारंभी कलानंद कथ्थक नृत्य संस्थेच्या कलावंतांनी नृत्य सादर केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी केले. सखी सम्राज्ञी स्पर्धेसाठी अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, गोवा, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे आणि सोलापूर येथील स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेतील पहिल्या प्रांतिक वेशभूषा फेरीत स्पर्धकांनी विविध प्रांतांची वेशभूषा करून रंगमंचावर येत आपला परिचय करून दिला. दुसऱ्या ‘कलाविष्कार’ या फेरीत स्पर्धकांनी कलागुण सादर केले. त्यामध्ये अनेकांनी नृत्य, तर काहींनी अभिनय सादरीकरण केले. अॅड मॅड शो फेरीत सहभागी स्पर्धक सखींनी विविध प्रकारच्या उत्पादनांचे विडंबनात्मक सादरीकरण करून धमाल उडवून दिली. परीक्षक फेरीत स्पर्धकांनी समर्पक उत्तरे दिलीत. स्पर्धेच्या पहिल्या फेरीनंतर सॅव्ही फॅशन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी ‘साडी शो’ प्रस्तुत केला. सॅव्हीच्या संचालक श्रुती भुतडा यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. या शोसाठी सोनी पैठणीच्या वतीने साड्या, तर दंडे यांच्या वतीने दागिने पुरविण्यात आले. यावेळी गायक अभिजित कोसंबी यांनी आपल्या सुरेल आवाजात विविध गीते सादर करून उपस्थित रसिकश्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी त्यांच्या ‘एक छत्री मला दिसते’ या अल्बमचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या महाअंतिम सोहळ्यात अभिनेते सचिन खेडेकर उपस्थित झाले. राज्यभरातील सखी मंच संयोजिका कार्यक्रमास उपस्थित होत्या. नागपूरच्या नेहा जोशी यांनी या रंगतदार सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)स्पर्धेचा निकाल या महाअंतिम फेरीत जळगावच्या रिनी शर्मा या ‘सखी सम्राज्ञी’ ठरल्या, तर मुंबईच्या पल्लवी म्हैसकर यांनी द्वितीय, नाशिकच्या श्रद्धा राजधर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. उत्कृष्ट वेशभूषा- शिवानी सावदेकर (नागपूर), उत्कृष्ट कलाविष्कार- शीतल माने (कोल्हापूर), उत्कृष्ट अॅड मॅड शो- भारती केळकर (गोवा).
जळगावच्या रिनी शर्मा ठरल्या किताबाच्या मानकरी
By admin | Updated: September 2, 2014 23:33 IST