कोपरगाव : गेल्या सहा महिन्यांपासून पाऊस कमी होणार याचा अंदाज हवामान खाते वर्तवित होते़ वेळीच नियोजन केले असते तर आज पाण्याची टंचाई भासली नसती़ गेल्या दहा वर्षात येथील लोकप्रतिनिधींना नवीन पाणी उपलब्ध करता आले नाही़ आहे ते पाणी घालवून बसले आणि पाणी येणार-येणार म्हणून जनतेला झुलवत ठेवण्याचे काम त्यांनी केले, असा आरोप संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी आ़ अशोक काळे यांचे नाव न घेता केला़कोपरगाव तालुक्यात बिकट झालेल्या पाणी प्रश्नाबाबत गोदावरी कालवे पाटपाणी संघर्ष समितीच्या बैठकीत कोल्हे बोलत होते़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे होते़ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष त्र्यंबकराव सरोदे, राहात्याचे तालुकाध्यक्ष धनंजय जाधव, दिलीप दारूणकर, संजीवनीचे उपाध्यक्ष साईनाथ रोहमारे आदी यावेळी उपस्थित होते. गेल्या पाच महिन्यांपासून गोदावरी कालव्यांना पाणी नाही, त्यावर कुणी आवाज उठवित नाही़ दहा वर्षापूर्वीच्या आणि नंतरच्या परिस्थितीची तुलना केली पाहिजे, असे सांगून बिपीन कोल्हे पुढे म्हणाले की, रांजणगाव देशमुख पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्यासाठी आम्ही उपोषण केले़ २०० केव्हीएचा ट्रान्सफार्मर संजीवनी कारखान्याने दिला़ एक्सप्रेस फिडर उपोषणामुळे मंजूर झाला़ त्याचे श्रेय मात्र भलत्यांनीच घेतले़गेल्या दहा वर्षात एक थेंबही पाणी नव्याने निर्माण झाले नाही़ उलट साडेतीन टिएमसी पाणी इंडियाबुल्स कंपनीला गेले़ आपल्या लोकप्रतिनिधींनी अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली की, शेतीचे सोडाच, पिण्यासाठी पाणी मिळेल का नाही, याची शाश्वती राहिली नाही.यावेळी बबनराव निकम, नानासाहेब गव्हाणे, अंबादास पाटोळे, रामदास रहाणे, अरूणराव औताडे, शिवाजी बारहाते, सुनील देवकर, मच्छिंद्र टेके, गोरक्षनाथ कोते, वाबळे, धनंजय जाधव, दारूणकर यांनी पाणी प्रश्नावर जनतेच्या भावना मांडल्या़ सूत्रसंचालन विश्वासराव महाले यांनी केले़ (प्रतिनिधी)इशारा देताच पाणी सुटलेमुळा व भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्राला पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची चिंता नाही़ चिंता फक्त गोदावरी कालव्यांवरील लाभधारकांनाच आहे़ आमचे पालखेडचे पाणी भुजबळांनी येवल्यात अडविले आणि निळवंडेचे पाणी जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी़ गोदावरीच्या पाण्यासाठी मराठवाड्याशी भांडावे लागते, असे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे म्हणाले़ पिण्याच्या पाण्यासाठी उपोषणाचा इशारा देताच पाटबंधारे विभागाने दारणा धरणातून पाणी सोडले. या पुढे पाणी मिळवायचे असेल तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असेही कोल्हे म्हणाले.
लोकप्रतिनिधींनी फक्त झुलवत ठेवले
By admin | Updated: July 30, 2014 00:46 IST