जामखेड : शहरातील तपनेश्वर रस्त्यावरील सुरू असलेले मटका केंद्र, बाजारतळ व भूतवडा रस्त्यावरील मावा विक्री करणाऱ्या पान टपऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईने शहरातील पान टपऱ्यांवर खुलेआम मावा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला जामखेड शहरात मावा विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी शहरातील तपनेश्वर रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलजवळ मटका बुकी करणारा रज्जाक बशिर पठाण (रा. जामखेड) हा आडोशाला लोकांकडून पैसै घेऊन कल्याण नावाचा हारजीतीचा मटका खेळत आढळून आला. त्या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी मटक्याचे साहित्य, रोकड असे एकूण १ हजार ३८० रुपये जप्त केले. पो. कॉ. प्रकाश गणपत वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या ठिकाणी याच दिवशी शहरातील बाजारतळ येथील सागर पान सेंटर व भूतवडा रोड येथील पान सेंटर येथे बंटी उर्फ सचिन सोपान डिसले (रा. संताजीनगर, जामखेड) हा राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला गुटखा तसेच हाताच्या सहाय्याने मावा तयार करून विक्री करत असताना आढळून आला. त्याच्याकडे झाडाझडती घेतली असता टपरीच्या आतमध्ये मावा बनविण्याचे साहित्य असा एकूण १२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पो. कॉ. रणजित जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. भाऊसाहेब मुरलीधर कुरूंद, रणजित जाधव, संभाजी कोतकर, पो. कॉ. शिवाजी भोस यांच्या पथकाने ही कारवाई केली.
---
इतर टपऱ्यांवरही कारवाई हवी...
शहरातील पानविक्रीच्या नावाखाली टपऱ्यांवर होणाऱ्या गुटखा व मावा विक्रीविरोधात पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तालुक्यात कडक पावले उचलली असली तरी शहरातील बस स्टँड, बाजारतळ, बीड रस्ता, खर्डा चौक, खर्डा रस्ता व जयहिंद चौक अशा ठिकाणी पानविक्रीच्या नावाखाली अनेक पानटपऱ्यांवर गुटखा व मावा विक्री होत आहे. या ठिकाणीही स्थानिक पोलिसांनी छापे टाकून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.