अहमदनगर : बारावीच्या परीक्षेत बुधवारी भौतिकशास्त्राच्या (फिजिक्स) पेपरदम्यान जिल्ह्यात बारा विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले़ परीक्षा नियंत्रणासाठी नेमण्यात आलेल्या पथकांनी हे कॉपीबहाद्दर पकडले़ शिक्षणाधिकारी (माध्यमिक) लक्ष्मण पोले यांच्या पथकाने पाथर्डी तालुक्यातील निऱ्हाळी विद्यालय केंद्रावर दोन तर मोहटा येथील विद्यालयात चार जणांना कॉपी करताना पकडले़ निरंतर शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी यांनी करंजी येथील विद्यालयात चार जणांना कॉपी करताना पकडले़ तर जिल्हास्तरावरील उपशिक्षणाधिकारी यांच्या पथकाने संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे दोन जणांना पकडले़ बुधवारी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा सकाळी ११ ते २ या वेळेत भौतिकशास्त्राचा पेपर सुरू होता़ परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी शिक्षण विभागाने भरारी पथकांची नेमणूक केली आहे़ पेपरच्या कालावधीत या पथकांमार्फत परीक्षा केंद्राची तपासणी केली जाते़ बुधवारी विविध ठिकाणी केलेल्या तपासणीत बारा जण कॉपी करताना आढळून आले़ या कॉपीबहाद्दरांनी लिहिलेली उत्तरपत्रिका ताब्यात घेऊन त्यांना नव्याने उत्तरपत्रिका देण्यात आली़ या विद्यार्थ्यांचा अहवाल परीक्षा मंडळाला पाठविण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी पोले यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
भौतिकशास्त्र पेपरला बारा कॉपीबहाद्दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2016 23:42 IST