राहुरी : नोकरी लावण्यासाठी माहेरून वीस लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी राहुरी तालुक्यातील केंदळ येथील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या छळास कंटाळून निलम बाचकर या तरुणीने रविवारी (दि. २०) विष प्राशन करून जीवन यात्रा संपविली. मात्र, तिला जबरदस्तीने विष पाजले, असा आरोप निलमच्या नातेवाइकांनी केला आहे. याबाबत राहुरी पोलिसांत एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
मयत निलम संतोष बाचकर (२२) या तरुणीचे माहेर संगमनेर तालुक्यातील असून तिचा विवाह राहुरी तालुक्यातील केंदळ येथील संतोष ठकाजी बाचकर याच्या बरोबर २०१६ साली झाला होता. लग्नानंतर निलमचा सुमारे एक वर्ष व्यवस्थित संसार चालू होता. मात्र, त्यानंतर संतोष बाचकर याला नोकरी लावण्यासाठी निलमने तिच्या आईकडून २० लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. या त्रासाला कंटाळून निलमने २० डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान विष प्राशन केले. निलमला आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून योगेश तुकाराम खेमनर यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात तिचा नवरा संतोष ठकाजी बाचकर, सासरा ठकाजी धोंडीराम बाचकर, सासू शांताबाई ठकाजी बाचकर, दीर दीपक व अशोक या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलम बाचकर हिला जबरदस्तीने विष पाजून तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. तसेच निलमला न्याय मिळावा, अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मयत निलमचे शवविच्छेदन अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात सोमवारी करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.
.................फोटो निलम बाचकर