सुपा : २००९ मध्ये बंद पडलेल्या पारनेर तालुका दूध संघाचे पुनरुज्जीवन होण्यासाठी राजकारणविरहित प्रयत्न गरजेचे आहेत. मात्र, येथील राजकीय साठमारीत दूध संघाचा दम कोंडला आहे. यामुळे ही सहकारातील कामधेनू अखेरची घटिका मोजत आहे.
जिल्हा सहकारी दूध संघाचे विभाजन होऊन सुपा येथे पारनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ २००२ मध्ये सुरू झाला. नंतरच्या काळात खासगी दूध शीतकरण केंद्र सुप्यात सुरू झाले. खासगीच्या स्पर्धेत संघाचे दूध संकलन घटल्याने २००९ मध्ये तो बंद पडला. आता त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राजकारणविरहित प्रयत्न होणे गरजेचे आहेत. मात्र, येथे पक्षीय राजकारण सुरू झाले आहे. त्यामुळे सहकारातील ही कामधेनू अखेरची घटिका मोजत आहे. तिला नवसंजीवनी देण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे.
यापूर्वीच्या संचालक मंडळाचे नेतृत्व करणारे राहुल पाटील शिंदे यांच्याकडून संघाची सत्ता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाजी रोहोकले, दादासाहेब पठारे, सुरेश थोरात या त्रिसदस्यीय समितीकडे देण्यात आली. त्यांनी सूत्रे हाती घेताच संघाकडे दूध उत्पादक संस्थेच्या असणाऱ्या ठेवीपोटी असणारी रक्कम परत देण्याचा निर्णय घेऊन कार्यवाही केली. आता संचालक मंडळाची निवडणूक व संघाचे संकलन वाढविण्यासाठी व संघ चालू करण्याबाबत व काही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा बोलाविली होती.
विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या प्रशासक नेमणूक आदेशाविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यात उच्च न्यायालयाने ४ डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशात संघाच्या वार्षिक सभेत कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नसल्याचे व घेतल्यास तो उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होईल, असे राहुल शिंदे यांनी सांगितले. संस्थांच्या ठेवी वाटपाचा निर्णय आमचा होता. संघाचे संकलन आम्ही सुरू केले. निवडणुकीसाठी लागणारी पूर्तता केली, असेही त्यांनी सांगितले.
दुधासाठी गावोगावी बल्क कूलर देऊन त्याद्वारे दूध संकलन करता येईल व नंतर तेथे शेतमालाची कोल्ड स्टोअरेजवजा जपवणूक व साठवण करण्याचे नियोजन प्रशासक मंडळाचे अध्यक्ष दादासाहेब पठारे यांनी केले आहे. तालुक्यातून सातत्याने जिल्हा सहकारी दूध संघात प्रतिनिधित्व करणारे रामचंद्र मांडगे व शशिकांत देशमुख यांना या व्यवसायातील बारकावे माहीत आहेत. त्यांचे राजकारणविरहित मार्गदर्शन घेता येईल.
-----
संघाच्या कोटी ते सव्वाकोटी रुपयांच्या मशिनरींची चोरी झाली. त्याची फिर्याद नाही. याचा अर्थ कुंपणानेच शेत खाल्ले. वार्षिक सर्वसाधारण सभेत यापूर्वीच्या लोकांनी काय दिवे लावले. याचे वाभाडे निघतील. त्यामुळे याबाबतच निर्णय घेण्यासाठी ‘स्टे’ देण्याचा खटाटोप करण्यात आला.
-संभाजी रोहोकले,
प्रतिनिधी, प्रशासकीय मंडळ
----------
सुरुवातीपासूनच तालुका सहकारी दूध संघ चालला पाहिजे, त्यासाठी संकलन वाढणे गरजेचे आहे. संघाचा कार्यभार पाहणाऱ्यांनी त्यासाठी दूध घातले पाहिजे, अशी आपली भूमिका आहे.
-राहुल शिंदे,
माजी अध्यक्ष, तालुका दूध संघ, पारनेर
फोटो १२ पारनेर दूध
पारनेर तालुक्यातील सुपा येथील बंद पडलेल्या तालुका सहकारी दूध संघाचे संकलन केंद्र.