अहमदनगर : सिध्दीबाग आणि महालक्ष्मी उद्यानाची दुरवस्था झाली आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता बागेचे सुशोभिकरण आणि दैनंदिन देखभाल-दुरुस्ती खासगीकरणातून केली जाणार आहे. महापौर अभिषेक कळमकर, उपायुक्त अजय चारठाणकर यांनी गुरुवारी सिद्धीबागेची पाहणी करून सुशोभिकरणाचे नियोजन केले. खासगीकरणाचा प्रस्ताव तयार झाला असून त्याची निविदा प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे.उद्यानात खेळण्यासाठी पुरेसे साहित्य नाही. संरक्षक भिंतीची जाळी तुटलेली असून बागेत बसण्यासाठी नागरिकांना पुरेशी जागा नाही. बागेची जागा भरपूर असली तरी पुरेशी जागा व अद्ययावत खेळणी बसविण्यासाठी बागेचे सुशोभिकरण आणि देखभाल खासगीकरणाच्या माध्यमातून केली जाणार आहे. सिध्दीबागेप्रमाणेच महालक्ष्मी उद्यानाची देखील खासगीकरणाच्या माध्यमातून देखभाल केली जाणार आहे. तसा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार झाला आहे. शालेय मुलांच्या परीक्षा आता संपल्या आहेत. त्यामुळे बागेत येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यादृष्टीने बागेची रोज स्वच्छता करणे, झाडलोट करून कचरा घंटागाडीत टाकावा तसेच नियमित औषध फवारणी करावी असे आदेश उपायुक्त अजय चारठाणकर यांनी दिले.
उद्यानांचे रुपडे पालटणार
By admin | Updated: April 7, 2016 23:55 IST