लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर : कोरोना संकटात अनेकांनी जीव गमावले. मुलांनी आपले आई, वडील गमावले. त्यामुळे ही मुले निराधार झाली. त्यांच्या मदतीसाठी भारतीय जैन संघटना सरसावली असल्याची माहिती संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य आदेश चंगेडिया, सुरेश बाठिया, मनसुख चोरडिया व चंदनमल बाफना यांनी दिली.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतिलाल मुथ्था यांच्या मार्गदर्शनाखाली अशा मुलांचे पालकत्व घेतले जाणार आहे. पाचवी ते अकरावीच्या वर्गातील मराठी व सेमी इंग्रजी माध्यमातील सुमारे ७०० विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांची संघटनेच्या वाघोली (जि. पुणे) येथील शैक्षणिक संकुलामध्ये मोफत राहण्याची, भोजनाची व शिक्षणाची जबाबदारी घेतली जाणार आहे.
जिल्ह्यातील अशा निराधार मुलांची माहिती समन्वयक आदेश चंगेडिया हे घेत आहेत. ते जिल्हाधिकारी यांच्या संपर्कात आहेत. अशा मुलांच्या नातेवाइकांशी चर्चा करून व त्यांच्या संमतीने हे काम केले जाणार आहे. नागरिकांनी संघटनेच्या प्रमुखांशी संपर्क साधावा, असे आवाहन आदेश चंगेडिया, सुरेशचंद्र बाठिया व मनसुख चोरडिया यांनी केले आहे.
भारतीय जैन संघटनेने यापूर्वी लातूर भूकंपग्रस्तांतील एक हजार १००, मेळघाट व ठाण्यातील एक हजार १०० व शेतकरी आत्महत्येतील आत्महत्याग्रस्त ७०० असे सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहेर काढले. शांतिलाल मुथ्था यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे पुनर्वसन केले. आता कोविड संकटातही मदत केली जाणार आहे.
---------